आजवर ऊस शेतीत अधिक उत्पन्नासाठी मोठ्या प्रमाणात खत, पाणी आणि मेहनत केली जात होती. मात्र, तरीही उत्पादन सातत्याने मिळत नव्हते. कारण पिकाला नेमकी काय आणि किती गरज आहे याचा अंदाज सरळ न लागणे ही मोठी समस्या होती. पण एआयमुळे हे चित्र बदलण्यास सुरुवात झाली आहे. ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’च्या मदतीने ऊसाच्या वाढीवर सतत लक्ष ठेवले जाते आणि पिकाला नेमक्या वेळी योग्य पद्धतीने पाणी व पोषण दिले जाते. त्याचा थेट फायदा उत्पादनात दिसून येत आहे.
advertisement
एआयने उत्पादन कसे वाढवले?
एआय तंत्रज्ञान प्लॉटमधील हवामान, माती आणि रोपांची स्थिती यांचे अचूक विश्लेषण करते. जमीनीत बसवलेल्या सेन्सरद्वारे ओलाव्याचे मोजमाप कळते आणि पाण्याची गरज नेमकी कधी आहे हे ठरते. सॅटेलाइट मॅपिंगच्या मदतीने पिकाची वाढ, तापमान आणि पर्यावरणातील बदलांचा डेटा गोळा होतो. याशिवाय मोबाईल अॅपद्वारे पिकाच्या अवस्थेविषयी सतत माहिती मिळते. ज्यामुळे खत, पाणी आणि कीडनियंत्रण अचूक प्रमाणात केले जाते.
अशा व्यवस्थापनामुळे पिकाची वाढ वेगाने आणि व्यवस्थित होते. एआयच्या वापराने ऊसाचे वजन आणि उंची दोन्ही पूर्वीपेक्षा जास्त होत असल्याचे तज्ज्ञांच्या अभ्यासात दिसले आहे. यामुळे प्रति एकर उत्पादन 100 ते 150 टनांपर्यंत मिळू लागले आहे.
एआयमुळे काय बचत होते?
एआयचा वापर शेतकऱ्यांना फक्त जास्त उत्पादन देत नाही तर खर्चही मोठ्या प्रमाणात कमी करतो. यामुळे पाण्यात 30 ते 35% बचत होते. तर खतांचा वापर 25 ते 30% कमी होतो. आणि कीटकनाशके मजुरीचा खर्चही घटतो. तसेच पिकाला गरजेनुसारच पाणी व खत मिळाल्याने जमिनीचा सेंद्रिय कस टिकून राहतो. मातीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढल्यामुळे भविष्यातील उत्पादन क्षमतेवरही सकारात्मक परिणाम होतो.
कृषी क्षेत्रासाठी मोठा टर्निंग पॉइंट
बारामतीतील प्रयोगातून एआयने ऊस उत्पादन 40% ने वाढवले असल्याचे परिणाम मिळाले आहेत. हा मॉडेल पुढील काही वर्षांत राज्यभरातील ऊस शेतीसाठी महत्त्वाचा ठरू शकतो. एआयवर आधारित शेतीमुळे कमी पाण्यात जास्त उत्पादन मिळत असल्याने दुष्काळप्रवण भागातील शेतकऱ्यांनाही याचा मोठा फायदा होऊ शकतो.
