जालना जिल्ह्यातील अंबड, घनसावंगी, जालना, बदनापूर या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मोसंबी फळाच्या बागा आहेत. तिथे प्रसिद्ध मोसंबी मार्केट देखील आहे. सध्या या मार्केटमध्ये 'आंबिया बहारा'ची मोसंबी दाखल होत आहे. दररोज 30 ते 40 टन मोसंबीची आवक होत असून प्रति टन 12 ते 17 हजार रुपये दर मिळत आहे.
advertisement
मालाची होणार बचत
मार्केटमध्ये मोसंबी विक्रीस आणणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति टन 50 किलो मोसंबी सूट म्हणून द्यावी लागे. मालाच्या गुणवत्तेत असलेल्या अनिश्चिततेमुळे ही सूट ग्राह्य धरली जात असे. या निर्णयात बदल करण्यात आला आहे. यापुढे शेतकरी जेवढी मोसंबी विक्रीसाठी आणतील तेवढीच ग्राह्य धरली जाईल. प्रति टन 50 किलो सूट घेतली जाणार नाही, असं आडत असोसिएशनचे अध्यक्ष नाथा पाटील घनघाव यांनी लोकल 18 शी बोलताना सांगितलं.
मिळणार रोख किंमत
त्याचबरोबर, शेतकऱ्यांना रोख पैसे हवे असल्यास शेकडा दोन रुपये वजा करून पैसे दिले जात होते. नवीन निर्णयानुसार शेतकऱ्यांना 20 हजार रुपयांपर्यंत रोख पैसे घेता येणार आहे. त्यात कोणतीही वजावट केली जाणार नाही. 20 हजार रुपयांवरील रक्कम घेण्यासाठी चेकचा वापर करावा लागणार आहे. या दोन निर्णयांमुळे मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना दुहेरी दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक फायदा होत असल्याने मोसंबी बाजारात आवक मोठ्या प्रमाणावर वाढेल, असं घनघाव यांनी सांगितलं.
सध्या बाजारात आंध्र प्रदेशमधील मोसंबी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. महिनाभरात ही मोसंबी कमी होईल. तेव्हा आपल्या भागातील मोसंबीला प्रति टन वीस ते पंचवीस हजार रुपये दर मिळेल, अशी शक्यता देखील घनघाव यांनी व्यक्त केली.