सांगली: महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी होणाऱ्या जनावरांच्या यात्रा किंवा जत्रा कृषी अर्थव्यवस्थेमध्ये विशेष भर टाकत असतात. बरेच यांत्रिकीकरण होऊन देखील जनावरांच्या यात्रा आजही टिकून आहेत. यापैकीच पशुधनाचे वैशिष्ट्य ठरणाऱ्या सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील खरसुंडी येथील खिलार जनावरांच्या यात्रेविषयी जाणून घेऊयात.
सांगली जिल्ह्यातील खरसुंडी हे श्री सिद्धनाथाचे तीर्थक्षेत्र आहे. येथे पौष पौर्णिमेनिमित्त खिलार जनावरांच्या यात्रेची दिर्घ परंपरा आहे. खरसुंडी-नेलकरंजी रस्त्यालगत घोडेखुर या सुमारे 50 एकर जागेवरती यात्रा भरते. आठवडाभर चालणाऱ्या या यात्रेचे संपूर्ण नियोजन आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समिती आणि खरसुंडी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने केले जाते. या यात्रेतून शेळ्या- मेंढ्यांसह खिलार जनावरांचा बाजार मोठ्या प्रमाणात होतो.
advertisement
श्री सिद्धनाथ देवस्थान हे महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील लोकांचे कुलदैवत असल्याने इथे तिन्ही राज्यातील भाविक एकत्र येतात. सिद्धनाथाच्या वेगवेगळ्या यात्रांपैकी पौष पौर्णिमेला भरणारी ही विशेषतः खिलार जनावरांची यात्रा असते. खरसुंडी येथील पौषी यात्रेत खिलार जनावरांच्या बाजारात पैदाशीसाठी लागणाऱ्या खिलार कपिल जातीच्या बैलांना लाखोंची बोली लागते. तसेच शेतीसाठी लागणाऱ्या बैलांना 50 हजार ते 2 लाखांचा दर मिळत असल्याचे शेतकरी सांगतात. अलीकडे पळाऊ खोंडांची मोठ्या प्रमाणात खरेदी- विक्री होते. पौष पौर्णिमेपासून आठ दिवस चालणाऱ्या या यात्रेत सुमारे आठ कोटींची उलाढाल होत असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव शशिकांत जाधव यांनी सांगितली.
पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड, चेकनेट बोरांनी आणला जीवनात गोडावा, शेतकऱ्याची लाखोंची कमाई
कपिल जातीच्या बैलांना लाखोंची बोली
खरसुंडी येथील पौष यात्रेमध्ये पैदाशीसाठी लागणाऱ्या खिलार कपिल जातीच्या बैलांना लाखोंची बोली लागते. काळा रंग, चकचकीत कांती, डौलदार शिंगे, आकर्षक बांधा आणि धिप्पाड देखणे बैल खरसुंडी यात्रेचे प्रमुख आकर्षण असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भगवान पाटील यांनी लोकल 18 शी बोलताना सांगितले.
बाजार तळावर सोयीसुविधा
खरसुंडी-नेलकरंजी रस्त्यालगत सुमारे 50 एकराच्या घोडेखुर या मैदानावरती जनावरांची यात्रा भरते. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत जनावरांची खरेदी विक्री सुरू असते. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश राज्यातून शेतकरी व्यापारी मोठ्या संख्येने येतात. हजारो शेतकरी व्यापाऱ्यांची गर्दी आणि कोट्यावधींची उलाढाल होते. सर्वांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस सुरक्षा तसेच वीज, पाणी आणि आपत्कालीन आरोग्य व्यवस्था सज्ज ठेवून विशेष काळजी घेण्यात येत असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शंकर भिसे यांनी सांगितले.
सांगलीच्या आटपाडी सह परिसरामध्ये पशुधन हाच लोकांच्या जगण्याचा मुख्य आधार आहे. अनेक पशुधनप्रेमी आणि व्यापारी खिलार जनावरांची वाजत गाजत मिरवणूक काढून यात्रेचा आनंद साजरा करतात. खरसुंडी येथील यात्रेनिमित्त अनेक व्यापारी आणि पशुपालकांना जातिवंत खिलार जनावरांची खरेदी विक्री करता येते. दर्जेदार खिलार जनावरे मिळत असल्याने दिवसेंदिवस यात्रेचे आकर्षण पशुपालकांसाठी वाढत चालले आहे.