थंडी कमी,तरीही कांद्याचे उत्तम उत्पादन
यंदाच्या हंगामात कमी तापमानाचा फटका कांद्याला बसला, तरीही पाटील यांनी योग्य व्यवस्थापनाने कांद्याला 35-40 रुपये प्रतिकिलो दर मिळवला. एका एकरातून तीन लाख रुपयांचे उत्पन्न तर सोयाबीन पिकातून 11 क्विंटलचे उत्पादन मिळाले. त्याचबरोबर, ऊस पिकाचा हंगाम पूर्ण झाल्यानंतर 60-65 टन ऊसाचे उत्पन्न अपेक्षित आहे. त्यामुळे संपूर्ण वर्षभरात चार लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न होणार आहे.
advertisement
ऊस आणि कांद्याची एकत्र लागवड
पाटील यांनी शेतीत एक अभिनव प्रयोग केला.त्यांनी ऑक्टोबर महिन्यात सरीच्या दोन्ही बाजूंना कांद्याची लागवड केली आणि एक महिन्यानंतर त्याच सरीमध्ये उसाची लावण केली.या पद्धतीने त्यांनी जमिनीचा पूर्ण वापर करत उत्पादन वाढवले. कांद्याच्या रोपांमध्ये योग्य अंतर ठेवल्याने जास्त प्रमाणात कांद्याची वाढ झाली. ऊस आणि कांद्याच्या मिश्रशेतीमुळे जोखीम कमी आणि नफा जास्त मिळेल.
नोकरी गमावली,पण शेतीत कमावले यश
17 वर्षांपूर्वी एका साखर कारखान्यातून नोकरी गेल्यानंतरही पाटील निराश झाले नाहीत. त्यांनी शेतीत पूर्णपणे लक्ष केंद्रित केले आणि प्रचंड मेहनतीच्या जोरावर आज यशस्वी शेतकरी बनले आहेत. पाण्याची कमतरता जाणवत असल्याने त्यांनी वेदगंगा नदीपासून दीड किलोमीटर लांब पाईपलाइन टाकून स्वतःच्या शेतासाठी पाणी उपलब्ध केले.
शेती ही नोकरीपेक्षा कमी नाही
"शेती ही केवळ निसर्गावर अवलंबून नसून, योग्य नियोजन, मेहनत आणि तंत्रज्ञान वापरल्यास मोठे उत्पन्न मिळवता येते. नोकरीसारखेच शेतीतही झोकून देऊन काम केल्यास चांगले उत्पन्न कमवता येते," असे मत निवृत्ती पाटील यांनी व्यक्त केले.
दरम्यान, निवृत्ती पाटील यांनी कठीण परिस्थितीतही हार न मानता शेतीत यश मिळवले. त्यांचा हा प्रवास तरुण शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरू शकतो. मेहनत, आधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य नियोजनाच्या जोरावर शेती ही चांगला उत्पन्नाचा स्रोत बनू शकते, हे त्यांनी सिद्ध केले आहे.
