पुणे : उन्हाच्या तीव्र झळांमुळे लिंबाची मागणी झपाट्याने वाढत आहे. सध्या लिंबांचे दर भाजीपाल्याला मागे टाकत थेट पेट्रोलच्या दरांशी स्पर्धा करत आहेत. किरकोळ बाजारात एका लिंबासाठी तब्बल 8 ते 10 रुपये मोजावे लागत आहेत. तर 50 रुपयांना केवळ 5 लिंबू मिळत असल्याने सर्वसामान्य ग्राहकांची चांगलीच कसरत सुरू आहे.
चिकनपेक्षा लिंबू महाग
advertisement
उन्हाळ्यामुळे लिंबूचा वापर घरगुती तसेच व्यावसायिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होत आहे. मागणी वाढली असली तरी पुरवठा मात्र कमी झाल्याने दर झपाट्याने वाढत आहेत. सध्या चिकनपेक्षा लिंबू महाग मिळत आहे. 1 किलो लिंबूचे दर 140 ते 160 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. घाऊक बाजारात गोणीचे दरही 2500 ते 3000 रुपयांच्या घरात पोहोचले आहेत.
Ginger Rate: कधी सोन्याचं मोल, तर कधी मातीमोल! आले उत्पादकांवर संकट, खर्चही निघेना, किती मिळतोय दर?
पुण्याच्या मार्केटमध्ये कर्नाटकी लिंबू
लिंबाचा मुख्य पुरवठा विजापूर, कर्नाटक आणि हैदराबाद येथून होतो. परंतु यंदा गावरान लिंबू बाजारात फारच कमी प्रमाणात उपलब्ध आहे. उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे उत्पादनावर परिणाम झाल्याने पुरवठा घटला आहे, याचा थेट परिणाम दरांवर झाला आहे. त्यामुळे लिंबू सध्या गवार, वांगी, मटार आणि इतर भाज्यांपेक्षाही महाग झाले आहे.
लिंबाची मागणी जसजशी वाढत आहे, तसतसे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. पुरवठा कमी राहिल्यास लिंबाचे दर 200 रुपये किलोपर्यंत पोहोचू शकतात, असे पुण्यातील लिंबू व्यावसायिक विजय सोनार यांनी सांगितलं. दरम्यान, उन्हाळ्याच्या झळांनी लिंबूचे बाजारभाव वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना मात्र चांगलाच फटका बसत आहे.