चार महामार्ग ठप्प, कोर्टाचा हस्तक्षेप
बच्चू कडू यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे नागपूर परिसरातील चार प्रमुख महामार्गांवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. शेतकरी आणि दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. वाढत्या तणावामुळे हायकोर्टात या प्रकरणी सुमोटो याचिका दाखल झाली. कोर्टाने संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आंदोलनस्थळ रिकामं करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर बच्चू कडू यांनी नागपूर पोलिसांकडे स्वतःहून अटक होण्यासाठी पायी मोर्चा काढला. हजारो आंदोलक त्यांच्यासोबत निघाले आणि या दरम्यान नागपूर शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
advertisement
शिष्टमंडळासमवेत काय चर्चा झाली?
राज्य सरकारने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तत्काळ पाऊले उचलली. मंत्री पंकज भोयर आणि आशिया जयस्वाल यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने रात्री आठ वाजता नागपुरात खापरी येथे आंदोलनकर्त्यांची भेट घेतली होती. या वेळी दोन्ही बाजूंमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. सरकारच्या प्रतिनिधींनी वरिष्ठ नेत्यांशी फोनवर चर्चा केल्यानंतर काही महत्त्वाचे निर्णय घेण्याचे संकेत दिले.
मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी देखील नागपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यांनी म्हटलं की, “शेतकरी वर्ग अडचणीत आहे. नागपूरमध्ये शेतकरी, दिव्यांग आणि गोरगरीब बांधव बसले आहेत. आता अटीतटीची वेळ आहे. त्यामुळे आम्ही तातडीने नागपूरकडे निघालो आहोत, शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं हीच खरी साथ आहे.” त्यामुळे जरांगे यांच्या सहभागामुळे आंदोलनाला आणखी बळ मिळण्याची चिन्हं आहेत.
मुंबईत बैठक, तोडगा निघणार का?
दरम्यान, आज मुख्यमंत्री फडणवीस आणि बच्चू कडू यांच्यात होणाऱ्या बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या बैठकीत शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सरकारने जर सकारात्मक निर्णय घेतला तर हे आंदोलन थांबण्याची शक्यता आहे.
