नागपूर : राज्य विधी मंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या नागपूर मध्ये सुरू आहे. आज शेतकऱ्यांच्या मुद्यांवरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले. शेतकरी कर्जमाफी, अतिवृष्टी अनुदान यावरून ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
advertisement
पॅकेजच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक?
सभागृहात बोलताना जाधव म्हणाले की, "सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजच्या नावाखाली राज्यातील शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झाली आहे." अतिवृष्टीमुळे खरडून गेलेल्या जमिनींचे पुनर्वसन कसे करणार, याची स्पष्ट भूमिका सरकारने मांडलेली नाही, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांचे नुकसान ज्या प्रमाणात झाले आहे, त्याप्रमाणे मदत न दिल्याचा आरोप त्यांनी सरकारवर केला.
चर्चेत मंत्री अनुपस्थित, जाधवांचे रोष व्यक्त
शेतकरी प्रश्नावर चर्चा करताना मंत्री सभागृहातून बाहेर गेल्याने भास्कर जाधव यांनी संताप व्यक्त करत सवाल उपस्थित केला. "शेतकऱ्यांच्या आयुष्य-मरणाच्या प्रश्नांवर चर्चा सुरू असताना मंत्री गेले कुठे?" सरकारकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
केंद्राकडे मदत प्रस्तावच पाठवला नाही?
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आवश्यक असलेल्या केंद्राच्या मदत प्रस्तावाबाबतही जाधवांनी सरकारवर गंभीर आरोप केले. "केंद्रीय कृषीमंत्र्यांनी स्पष्ट सांगितले की राज्य सरकारकडून कोणताही प्रस्ताव प्राप्त झालेला नाही. मग राज्य सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल का करत आहे?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. प्रस्ताव कधी पाठवला? त्याची तारीख सभागृहात जाहीर करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
केंद्रीय पथकाची पाहणी प्रश्नचिन्हाखाली
अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक आले असले तरी ते अत्यंत औपचारिकतेपोटी आणि रात्रीची पाहणी करून गेले, असा आरोप जाधवांनी केला. "शेतकरी आशेने पाहात बसला आहे की किमान केंद्राकडून काही मदत मिळेल. पण पाहणीच योग्य पद्धतीने झाली नाही तर निर्णय कसे होणार?" असा प्रश्न त्यांनी विचारला.
