मुंबई : केंद्र सरकारकडून पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 21 वा हप्ता अलीकडेच वितरित करण्यात आला. मात्र यावेळी राज्यातील तब्बल 6 लाखांहून अधिक शेतकरी अपात्र ठरले, अशी चर्चा वेगाने पसरत आहे. त्यामुळे पुढील ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’च्या 8 व्या हप्त्यापासून हे शेतकरी वंचित राहणार का, असा प्रश्न शेतकरी वर्तुळात मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत आहे. याच संदर्भातील वास्तव माहिती कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आली आहे.
advertisement
पीएम किसानचा 21 वा हप्ता, किती शेतकऱ्यांना मिळाला लाभ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच पीएम किसान योजनेचा 21 वा हप्ता देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित केला. या हप्त्यात 9 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 18,000 कोटी रुपये जमा झाल्याची माहिती केंद्र सरकारने दिली. महाराष्ट्रात मात्र यावेळी लाभार्थ्यांच्या संख्येत घट पाहायला मिळाली असून सुमारे 6 लाख शेतकऱ्यांची नावे यादीतून वगळण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.
कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार, या हप्त्यासाठी 90,41,241 शेतकरी पात्र ठरले. राज्यातील कृषी खात्याने दिलेल्या माहितीनुसार, यावेळी पीएम किसानच्या 21 व्या हप्त्यात 1,808 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले.
शेतकरी अपात्र का ठरले? कारणे काय?
कृषी विभागानुसार, योजनेच्या पात्रतेची तपासणी (Verification) करताना आढळलेल्या काही विसंगतींमुळे अनेक नावे वगळली गेली. त्यातील प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे -
दुहेरी लाभ घेणारे लाभार्थी
मृत शेतकऱ्यांची नावे यादीत राहणे
जमिनीच्या नोंदी आणि खात्याच्या माहितीमध्ये विसंगती
आधार आणि बँक लिंकिंगमध्ये झालेल्या त्रुटी
या सर्व कारणांमुळे तात्पुरत्या स्वरूपात अनेक शेतकरी या हप्त्यापासून वंचित राहिले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
नमो शेतकरी महासन्मान निधीसाठी किती शेतकरी पात्र?
पीएम किसानसोबत राज्य सरकारची ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ ही योजना लागू आहे. कृषी विभागानुसार, या योजनेच्या 8 व्या हप्त्यासाठी देखील 90,41,241 शेतकरी पात्र ठरणार आहेत. म्हणजेच, पीएम किसानच्या 21 व्या हप्त्यातून ज्यांची नावे वगळली गेली, त्यांना नमो योजनेच्या पुढील हप्त्यातून वगळण्यात येणार नाही, अशी स्पष्टता देण्यात आली आहे.
8 वा हप्ता कधी जमा होणार?
नमो शेतकरी महासन्मान निधीच्या 8 व्या हप्त्याबाबत शेतकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नसली, तरी डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, अशी प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.
दरम्यान, पीएम किसान योजनेतून अनेक शेतकऱ्यांची नावे वगळल्याच्या चर्चेमुळे संभ्रमाची स्थिती निर्माण झाली असली, तरी कृषी विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते की नमो शेतकरी योजनेतून कोणत्याही शेतकऱ्याला वगळले जाणार नाही. दरम्यान, शेतकऱ्यांनी आपली जमीन नोंद, आधार लिंकींग आणि बँक डिटेल्स योग्य आहेत का, याची खात्री करून घ्यावी.
