केंद्र-राज्य मिळून 12 हजारांचा आधार
केंद्र सरकार ‘पंतप्रधान किसान सन्मान निधी’ योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला वर्षातून 6 हजार रुपये देते. त्याच धर्तीवर राज्य सरकारने आणखी ६ हजार रुपयांची तरतूद करून ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ सुरू केली. या योजनेत केंद्राच्या लाभार्थ्यांनाच समाविष्ट केले जाते आणि पीएम किसानच्या प्रत्येक हप्त्यासोबत राज्य सरकारचा हप्ता देण्यात येतो. त्यामुळे शेतकऱ्यांना दरवर्षी एकूण 12 हजार रुपयांचा आधार मिळतो.
advertisement
उशीर का झाला?
केंद्र सरकारने पीएम किसानचा 20 वा हप्ता 2 ऑगस्ट रोजी वितरित केला. त्या वेळीच नमो शेतकरी योजनेचाही हप्ता शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित होते. मात्र, राज्याच्या आर्थिक भारामुळे आवश्यक निधी तातडीने उपलब्ध न झाल्याने राज्य सरकारकडून हप्ता रोखण्यात आला. सूत्रांच्या माहितीनुसार,निधी उभारणीसाठी काही काळ लागल्याने हा हप्ता जवळपास महिनाभर उशिरा मिळणार आहे.
सातव्या हप्त्याचा लाभ
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत सहा हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. आता एप्रिल ते जुलै २०२५ या कालावधीचा सातवा हप्ता वितरित होणार आहे. यासाठीची सर्व प्रशासकीय व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पंधरवड्याचा कालावधी लागणार असल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना दिलासा
या हप्त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामातील खर्चाला थेट मदत होईल. खत, बियाणे, औषधे, सिंचन आणि इतर शेतीसंबंधी गरजांसाठी २ हजार रुपयांची मदत उपयुक्त ठरेल. सरकारच्या म्हणण्यानुसार, ही योजना शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी सुरू केली असून, पुढील काळात ती अधिक प्रभावीपणे राबविण्याचा मानस आहे.
योजनांची जबाबदारी
शासन निर्णयानुसार, वितरित करण्यात येणारा निधी योग्य लाभार्थ्यांच्या खात्यातच पोहोचावा याची जबाबदारी कृषी आयुक्तालयावर असेल. तसेच, प्रत्येक हप्त्यानंतर बँक खात्यात उरलेला निधी आणि त्यावरील व्याज शासनाच्या खात्यात जमा करणे बंधनकारक असेल.
दरम्यान, जरी निधी वितरणात थोडा विलंब झाला असला, तरी राज्य सरकारकडून अखेर निधीची तरतूद पूर्ण करण्यात आली आहे. पुढील पंधरवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाल्यावर त्यांना दिलासा मिळणार आहे.