मुंबई : महाराष्ट्रातील लाखो शेतकरी सध्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत. केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ योजनेचा 21 वा हप्ता सुमारे महिनाभरापूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला असून, त्यानंतर राज्य सरकारकडून मिळणाऱ्या अतिरिक्त आर्थिक मदतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, या हप्त्याच्या वितरणापूर्वीच काही महत्त्वाच्या घडामोडी समोर आल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
advertisement
8 वा हप्ता कधी मिळणार?
राज्यातील 29 महानगरपालिकांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या आदर्श आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे कोणतीही आर्थिक योजना थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करताना शासनाला निवडणूक आयोगाच्या नियमांचे पालन करावे लागत आहे. याच कारणामुळे नमो शेतकरी महासन्मान निधीचा आठवा हप्ता अद्याप वितरित करण्यात आलेला नाही. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हा हप्ता दिला जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जात असली तरी शासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकरी वर्गात संभ्रम आणि अस्वस्थता वाढताना दिसत आहे.
दरम्यान, या हप्त्याच्या पार्श्वभूमीवर पात्र लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी घट होण्याची चिन्हे आहेत. कृषी विभागाने यंदा योजनेच्या निकषांची अंमलबजावणी अधिक काटेकोरपणे सुरू केली आहे. अपात्र लाभार्थी वगळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर छाननी मोहीम राबवली जात असून, याचा थेट परिणाम लाभार्थ्यांच्या आकड्यावर होत आहे. पीएम किसान योजनेच्या मागील हप्त्यावेळी लाभार्थ्यांची संख्या सुमारे 96 लाखांवरून 91 लाखांपर्यंत कमी झाली होती. त्याच धर्तीवर आता राज्याच्या योजनेतही 4 ते 5 लाख शेतकऱ्यांची नावे यादीतून वगळली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नावे का वगळली?
तपासणीदरम्यान सुमारे 28 हजार मृत लाभार्थ्यांची नावे यादीत आढळून आल्याने ती तात्काळ काढून टाकण्यात आली आहेत. तसेच एकाच जमिनीवर दोन वेळा लाभ घेत असल्याचे आढळलेल्या सुमारे 35 हजार लाभार्थ्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. याशिवाय, रेशनकार्डसंबंधी नियम अधिक कडक करण्यात आले असून, एका कुटुंबातील केवळ एका सदस्यालाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.
आयकर भरणारे शेतकरी तसेच शासकीय किंवा निमशासकीय सेवा क्षेत्रात कार्यरत असलेले लाभार्थीही या योजनेतून वगळण्यात आले आहेत. या सर्व कारणांमुळे लाभार्थ्यांची संख्या कमी होत असून, अनेक शेतकऱ्यांना अपेक्षित आर्थिक मदत मिळेल की नाही, याबाबत साशंकता आहे.
कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मते, ही छाननी प्रक्रिया केवळ गरजू, अल्पभूधारक आणि पात्र शेतकऱ्यांपर्यंतच योजनेचा लाभ पोहोचवण्यासाठी राबवली जात आहे. नियमांचे पालन केल्यास पात्र शेतकऱ्यांना हप्ता नक्कीच मिळेल, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, तोपर्यंत नमो शेतकरी महासन्मान निधीचा आठवा हप्ता नेमका कधी मिळणार? याकडे संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
