Weather Alert: महाराष्ट्रात पुन्हा वारं फिरलं, बर्फासारखी थंडी पडणार, हवामान विभागाचा अलर्ट
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. पुढील 24 तासांसाठी हवामान विभागाने महत्त्वाचा अलर्ट जारी केला आहे.
राज्यातील हवामानाने पुन्हा एकदा मोठे बदल जाणवत आहेत. ढगाळ वातावरण आणि काही भागांत झालेल्या हलक्या पावसामुळे किमान तापमानात घट झाली असून पहाटे आणि रात्री गारठा अधिक जाणवू लागला आहे. विदर्भात थंडीचा प्रभाव विशेषत्वाने वाढला असून काही जिल्ह्यांत तापमान एक अंकी पातळीवर पोहोचलं आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई–पुण्यासह राज्यातील विविध भागांत आज, 8 जानेवारी रोजी हवामानाची स्थिती कशी राहणार आहे, हे पाहणं महत्त्वाचं ठरत आहे.
advertisement
मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. पावसाची शक्यता नसली, तरी सकाळच्या वेळेत धुकं जाणवू शकतं. मुंबईत कमाल तापमान सुमारे 31 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. ठाणे, नवी मुंबईसह रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांतही साधारण अशीच हवामान स्थिती राहील. ढगाळ हवामानामुळे गारवा थोडासा वाढलेला जाणवेल, मात्र तीव्र थंडीचा फटका बसणार नाही.
advertisement
पुणे शहर आणि पुणे ग्रामीण भागात पहाटेच्या वेळी धुक्याची शक्यता असून त्यामुळे दृश्यमानतेवर परिणाम होऊ शकतो. पुण्यात कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 12 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत थंडीचा जोर कमी असला, तरी पहाटे गारवा कायम राहील. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागांतही सकाळी धुके आणि थंड हवा जाणवण्याची शक्यता आहे.
advertisement
मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागांत हवामान अधिक थंड राहणार आहे. मराठवाड्यात सकाळी धुके पडण्याची शक्यता असून त्यानंतर आकाश स्वच्छ होईल. छत्रपती संभाजीनगर येथे कमाल तापमान 30 अंश, तर किमान 13 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. विदर्भात थंडीचा प्रभाव अधिक तीव्र असून नागपूरमध्ये किमान तापमान 9 अंशांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. गोंदिया, अमरावती, वर्धा भागांत किमान तापमान 10 अंशांच्या खाली गेल्याने गारठा वाढला आहे. पश्चिम महाराष्ट्रातही पहाटे गारवा जाणवेल.
advertisement
एकंदरीत, राज्यात ढगाळ वातावरण, धुके आणि तापमानातील चढ-उतार यामुळे थंडी पुन्हा वाढल्याचं चित्र आहे. पुढील काही दिवस सकाळी गारवा आणि दिवसा तुलनेने सौम्य तापमान अशी स्थिती राहण्याची शक्यता आहे. विशेषतः विदर्भात थंडीचा जोर कायम राहणार असून, मुंबई-पुण्यात हवामान स्थिर असलं तरी गारवा जाणवत राहील. बदलत्या हवामानामुळे पुढील दोन दिवस राज्यातील हवामानात मोठे चढ-उतार दिसून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी.










