किंमतीत सतत घसरण
मागील तीन वर्षांच्या तुलनेत यंदा सोयाबीनच्या दरात मोठी घसरण झाली आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये सोयाबीनचा दर ५ हजार ६४७ रुपये प्रति क्विंटल, नोव्हेंबर २०२३ मध्ये ५ हजार २३ रुपये प्रति क्विंटल, तर नोव्हेंबर २०२४ मध्ये ४ हजार २०८ रुपये प्रति क्विंटल होता. मात्र यंदाच्या नोव्हेंबर २०२५ मध्ये दर फक्त ४ हजार २५ ते ४ हजार ३९० रुपये प्रति क्विंटल मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच दर एमएसपीपेक्षा जवळपास १ हजार रुपयांनी कमी आहेत. ही किंमत अंदाजित आहे आणि ती एफएक्यू ग्रेडच्या सोयाबीनसाठी लागू आहे.
advertisement
निर्यातीत घट, दरांवर परिणाम
सोयाबीनच्या दरांवर सर्वाधिक परिणाम सोयामीलच्या निर्यातीवर होतो. सन २०२३-२४ मध्ये १९.७ लाख टन सोयामील निर्यात झाली होती, तर २०२४-२५ मध्ये ती घटून १८ लाख टनांवर आली आहे. या घटीमुळे देशांतर्गत बाजारात पुरवठा वाढला, परिणामी किंमती कमी झाल्या. निर्यातीवरील घटकांमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदी, स्पर्धक देशांचे उत्पादन वाढ आणि रूपयाचा दर स्थिर राहिल्याने भारतातील सोयामील कमी स्पर्धात्मक ठरल्याचे तज्ज्ञ सांगतात.
आंतरराष्ट्रीय बाजाराचा दबाव
सोयाबीन हे जगातील प्रमुख तेलबिया पिक असून, अमेरिका, ब्राझील, आर्जेन्टिना, चीन आणि भारत या पाच देशांतून जागतिक उत्पादनाच्या जवळपास ९० टक्के सोयाबीनचे उत्पादन होते. या देशांमध्ये मागणी, पुरवठा आणि हवामानातील बदल यामुळे आंतरराष्ट्रीय दरात मोठे चढ-उतार होत असतात. ब्राझील आणि अमेरिकेत यंदा उत्पादन वाढल्याने जागतिक बाजारात सोयाबीनच्या दरात १०-१२ टक्क्यांची घसरण झाली आहे, त्याचा थेट परिणाम भारतीय बाजारावर झाला आहे.
भारताचे उत्पादन घटणार
भारतात २०२५-२६ हंगामात ११६ लाख टन सोयाबीन उत्पादन होण्याचा अंदाज आहे, जे मागील वर्षाच्या तुलनेत ८ टक्क्यांनी कमी आहे. मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान हे तीन प्रमुख राज्ये देशातील एकूण उत्पादनात ८० टक्के वाटा घेतात. या राज्यांमध्ये यंदा पावसाचे अनियमित प्रमाण आणि कीडरोगांचा प्रादुर्भाव यामुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे.
