21 वर्षे एसटी सेवा, कुठेही..., एका चालकाचा असाही सन्मान, Video पाहुन कराल कौतुक
- Reported by:Prachi Balu Kedari
- Published by:Mohan Najan
Last Updated:
तब्बल 21 वर्षे एकही अपघात न करता सेवा बजावणाऱ्या चालकांचा गौरव हा नक्कीच प्रेरणादायी ठरत आहे. एसटी चालक गोपाळ कामथे यांचा नुकताच एसटी महामंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला.
पुणे : वाढती वाहनसंख्या, अरुंद आणि अपुरे रस्ते आणि वाहतूक शिस्तीचा अभाव यामुळे अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अशा परिस्थितीतही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) तब्बल 21 वर्षे एकही अपघात न करता सेवा बजावणाऱ्या चालकांचा गौरव हा नक्कीच प्रेरणादायी ठरत आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत विनाअपघात सेवा देणारे एसटी चालक गोपाळ कामथे यांचा नुकताच एसटी महामंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला.
प्रवाशांचा एसटीवरील विश्वास अधिक दृढ व्हावा आणि चालकांना सुरक्षित वाहनचालनासाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने एसटी महामंडळाने विनाअपघात सेवा देणाऱ्या चालकांचा गौरव करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत 5, 10 आणि 15 वर्षे विनाअपघात सेवा पूर्ण करणाऱ्या चालकांची विशेष दखल घेतली जात आहे. तसेच 25 वर्षांहून अधिक काळ एकही अपघात न करता बस चालवणाऱ्या चालकांना 25 हजार रुपये रोख, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.
advertisement
गोपाळ कामथे यांनी 2005 साली एसटी महामंडळात चालक म्हणून सेवेला सुरुवात केली. त्यांची पहिली ड्युटी स्वारगेट येथून मुंबईकडे जाणारी होती. याआधी ते शेती तसेच ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करत होते. मात्र मनात कुठेतरी सरकारी नोकरी करण्याची इच्छा होती. त्याच दरम्यान एसटीची भरती निघाल्यानंतर त्यांनी चालक म्हणून प्रवेश केला.
advertisement
ट्रक चालकाचा अनुभव असल्यामुळे एसटी चालवताना भीती नव्हती, मात्र प्रवाशांच्या जीविताची जबाबदारी असल्याची जाणीव कायम होती, असे गोपाळ कामथे सांगतात. गेल्या 21 वर्षांत त्यांनी 20 हजारांहून अधिक फेऱ्या पूर्ण केल्या आहेत. रोज एक ते दोन, तर कधी त्याहून अधिक फेऱ्या होत असतात. सध्या गेली सुमारे 20 वर्षे ते शिवाजीनगर आगारातून कोल्हापूर आणि अलिबाग या मार्गावर नियमित सेवा बजावत आहेत.
advertisement
प्रवाशांना सुरक्षितपणे ने-आण करणे हीच चालकाची खरी जबाबदारी आहे. आम्ही प्रामाणिकपणे काम करत असल्यामुळेच सामान्य नागरिक एसटीवर विश्वास ठेवतात, असे मत त्यांनी व्यक्त केले. या सत्कारामुळे आपली जबाबदारी अधिक वाढल्याची भावना मनात असल्याचे सांगत, आतापर्यंत जसा सुरक्षित आणि विनाअपघात प्रवास केला, तसाच पुढेही करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. प्रवासाला निघण्यापूर्वी वाहनाची संपूर्ण तपासणी करणे आणि सुरक्षिततेला प्राधान्य देणे अत्यावश्यक असल्याचा संदेशही त्यांनी दिला.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 31, 2026 3:34 PM IST








