हप्ता का रखडला?
गेल्या काही आठवड्यांपासून देशभरातील पीएम किसान योजनेचे लाभार्थी शेतकरी २१ व्या हप्त्याची उत्सुकतेने वाट पाहत होते. मात्र, बिहार विधानसभेच्या निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू असल्याने केंद्र सरकारने हा हप्ता जाहीर करण्यात विलंब केला. आता निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अखेर पीएम किसान प्रशासनाने अधिकृतरित्या हप्त्याची तारीख जाहीर केली आहे.
अधिकृत घोषणा
advertisement
पीएम किसानच्या अधिकृत एक्स (ट्विटर) हँडलवरून माहिती देण्यात आली की देशातील नऊ कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात २१ वा हप्ता थेट जमा होईल. त्यामुळे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून रब्बी हंगामाच्या तयारीतही मदत होणार आहे.
या योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांना वर्षातून तीन हप्त्यांमध्ये ६,००० रुपये आर्थिक सहाय्य देते. प्रत्येक चार महिन्यांनी २,००० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात. हप्ता मिळण्यासाठी शेतकऱ्यांचा आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेला असणे, ई-केवायसी पूर्ण असणे आणि जमीन नोंद तपासणी योग्य असणे आवश्यक असते.
तुम्हाला २१ वा हप्ता मिळणार की नाही?
अनेक शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहे की यावेळी त्यांचे पैसे खात्यात जमा होणार की नाही. यासाठी पीएम किसान पोर्टलवर काही साधे टप्पे पूर्ण करावे लागतात.
१) अधिकृत वेबसाईटला भेट द्या
सर्वप्रथम पीएम किसानची अधिकृत वेबसाईट
pmkisan.gov.in येथे जा.
'लाभार्थी स्थिती' पर्याय निवडा
होमपेजवर 'Beneficiary Status' किंवा 'लाभार्थी स्थिती' या पर्यायावर क्लिक करा.
२) आवश्यक माहिती भरा
तुम्ही तुमचा आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा मोबाईल नंबर वापरून स्थिती तपासू शकता. संबंधित माहिती भरल्यानंतर "Get Data" या बटणावर क्लिक करा.
३) तुमची स्थिती स्क्रीनवर दिसेल
क्लिक केल्यानंतर पुढील पृष्ठावर तुमचे नाव, हप्त्यांची स्थिती, पैसे मंजूर झाले आहेत का, बँकेकडे पाठवले गेले आहेत का, याची सर्व माहिती स्क्रीनवर दिसेल.
यापद्धतीने तुम्हाला २१ वा हप्ता मिळणार आहे की नाही? हे अगदी सहज कळू शकते. कोणतीही चूक असल्यास शेतकऱ्यांना ग्रामसेवक, तलाठी किंवा CSC केंद्रांच्या माध्यमातून ई-केवायसी सुधारणा करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
