मागील हप्ता ऑगस्टमध्ये
२ ऑगस्ट २०२५ रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथून या योजनेचा २० वा हप्ता जारी केला होता. त्या वेळी ९.७१ कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात थेट २०,५०० कोटी रुपये जमा झाले. केवळ बिहारमधील ७५ लाख शेतकऱ्यांना या हप्त्याचा लाभ मिळाला. त्यामुळे पुढील हप्ता दिवाळीपूर्वी मिळेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
advertisement
हप्ता कधी येईल?
गेल्या काही वर्षांचा डेटा पाहिला तर सरकार ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान शेतकऱ्यांना पैसे पाठवते. २०२४ मध्ये १८ वा हप्ता ५ ऑक्टोबरला, २०२३ मध्ये १५ नोव्हेंबरला आणि २०२२ मध्ये १७ ऑक्टोबरला दिला गेला होता. यंदा दिवाळी २० ऑक्टोबरला असल्याने सरकार ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये हप्ता जारी करू शकते. तथापि, अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.
बिहार निवडणुका आणि हप्त्याची शक्यता
या वर्षी बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणुकीच्या तारखा सप्टेंबरअखेर जाहीर होऊ शकतात. आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच सरकार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हप्ता जाहीर करेल, अशी चर्चा आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यातच शेतकऱ्यांच्या खात्यात पुढील २,००० रुपयांचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे.
पीएम किसान योजना काय आहे?
२०१९ मध्ये सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपयांची मदत मिळते. हे पैसे तीन हप्त्यांमध्ये (प्रत्येकी २,००० रुपये) थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतात. आतापर्यंत २० हप्ते दिले गेले असून योजनेचा फायदा ११ कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांना मिळत आहे.
कोणत्या शेतकऱ्यांचे पैसे अडकू शकतात?
जर शेतकऱ्यांनी ई-केवायसी केले नसेल, आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक केले नसेल किंवा जमीन पडताळणी पूर्ण केली नसेल, तर त्यांचे पैसे थांबू शकतात. त्यामुळे ही सर्व प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे.
हप्त्याची स्थिती कशी तपासावी?
शेतकऱ्यांना त्यांचा हप्ता आला आहे की नाही हे तपासण्यासाठी pmkisan.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ‘शेतकरी कॉर्नर’ मधील ‘लाभार्थी स्थिती’ पर्यायावर क्लिक करावे. त्यासाठी आधार क्रमांक किंवा नोंदणी क्रमांक टाकावा लागतो. तसेच ‘लाभार्थी यादी’ पर्यायावर जाऊन गावातील सर्व शेतकऱ्यांची यादीही पाहता येते.
मदतीसाठी हेल्पलाइन
योजनेशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास शेतकरी खालील क्रमांकांवर संपर्क साधू शकतात
टोल फ्री क्रमांक :१५५२६१, १८००११५५२६
हेल्पलाइन क्रमांक : ०११-२३३८१०९२
ईमेल : pmkisan-ict@gov.in