सांगली: सांगली जिल्ह्यातील कृष्णा काठावर शेकडो एकर शेत जमीन क्षारपड झाली आहे. नापिकतेमुळे शेतीचे कोठ्यावधींचे नुकसान होत असूनही शासन दरबारी मात्र उपायांची उपेक्षा होताना दिसते. अशातच वाळवा तालुक्यातील बोरगावच्या सलगर बंधूंनी मात्र स्वखर्चाने सच्छिद्र निचरा प्रणाली उभारत नऊ एकर शेतीचा कायापालट करून शेतकऱ्यांपुढे आदर्श निर्माण केला आहे.
सांगलीच्या वाळवा तालुक्यातील बोरगाव येथील खराओढा सलगर मळ्यात धोंडीराम सलगर, तानाजी सलगर आणि बाबासाहेब सलगर या तीन भावांसह परिसरातील शेतकऱ्यांची शेकडो एकर शेती नापीक बनली आहे. येथील शेती 1990 पासून क्षारपड बनत गेली. क्षारपडाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत जाऊन अलीकडच्या काही वर्षात या जमिनीवर तणही उगवत नसल्याचे शेतकरी बाबासाहेब सलगर यांनी सांगितले.
advertisement
नोकरी सोडली, 10 गुंठ्यात यशस्वी केला नर्सरी व्यवसाय, तरुणाची 5 लाखांची कमाई
दरम्यानच्या काळात येथील स्थानिक आमदार जयंत पाटील यांच्या प्रयत्नातून सच्छिद्र निचरा प्रणाली प्रकल्प उभारण्यास सुरुवात झाली होती. मात्र काही काळानंतर निधी अभावी ही योजना शासनाकडून उपेक्षित राहिली आहे. शासनाने निराशा दाखवली तरी शेतजमिनींचे कोठ्यावधींचे नुकसान होत असल्याने सलगर बंधूंनी स्वतःच्या खिशातून पैसे घालून नऊ एकर शेतजमिनीवर सच्छिद्र निचरा प्रणाली उभारली आहे. यासाठी त्यांनी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने घेतले आहे.
अशी उभारली प्रणाली
नऊ एकर क्षेत्रावर 6 इंची पीव्हीसी पाईप, 4 इंची सछिद्र पाईप संपूर्ण क्षेत्रावर उभ्या आडव्या, समोर आणि बाजूस 50 फूटांवर टाकल्या आहेत. त्यातील क्षारयुक्त पाणी मेन लाइनमधून 2 हजार फूट लांब तीन चेंबरद्वारे खऱ्या ओढ्यात सोडले आहे. यासाठी त्यांनी 6 लाख रूपये खर्च केले आहेत. यासाठी त्यांना अभियंता बी. जी. पाटील व कृषी संशोधक डी. ए. चौगुले यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
सलगर बंधू अनुभवत आहेत निचरा प्रणालीचे फायदे
निचरा प्रणाली बसवल्यानंतर सलगर बंधु यांच्या शेतामध्ये नगदी पिके घेण्यास सुरुवात केली आहे. जमिनीतले शहराचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत असून सुरुवातीला जमिनीचा पोत सुधारण्यासाठी त्यांनी तागासारखी पिके घेतली. आता याच शेतामध्ये त्यांनी जोमदार उसाचे पीक घेतले आहे.
शासनाकडून अनुदानाची अपेक्षा
सांगली जिल्ह्यामध्ये कृष्णा काठावर असणारी शेकडो हेक्टर शेत जमीन क्षारपड आणि नापीक बनत चालली आहे. यामुळे कोट्यावधींचे नुकसान होत आहे. सच्छिद्र निचरा प्रणाली हा त्यावर एकमेव उपाय आहे. सच्छिद्र निचरा प्रणाली उभारण्यास एकरी 60 ते 70 हजार रुपयांचा खर्च असल्याने सामान्य शेतकऱ्यांना उभारणे शक्य नाही. यामुळे शासनाने प्रत्येक शेतकऱ्यास सच्छिद्र निचरा प्रणाली प्रकल्प उभारण्यासाठी अनुदान देण्याची गरज डॉ. सतीश सलगर यांनी व्यक्त केली.
सांगलीचा चांगला शेतकरी, केळीमधून 11 महिन्यात कमावले 11 लाख रुपये! Video
तसेच शेतशिवारांमध्ये असणारे ओढे-नाले वाहते राहिले तर क्षाराचा आपोआपच निचरा होतो. मात्र परिसरातील ओढे-नाले गाळमातीने भरले आहेत. त्यामध्ये पाण्यास जागाच शिल्लक राहिली नसल्याचे शेतकऱ्यांरी सांगित आहेत. यासाठी शासनाकडून वेळोवेळी ओढ्या -नाल्यांतील गाळ मोकळा करण्याची यंत्रणा राबवण्याची गरज शेतकऱ्यांनी लोकल 18 शी बोलताना व्यक्त केली.
लोकांनी दिला होता जमीन विकण्याचा सल्ला
सलगर बंधू यांची एकूण 20 एकर शेत जमीन आहे. यापैकी 9 एकर शेत जमीन खाराओढा परिसरामध्ये असल्याने ती पूर्णतः क्षारपड नापीक झाली होती. जमिनीमध्ये तणही उगवणे बंद झाले होते. यामुळे अनेक लोकांनी त्यांना जमीन विकून टाकण्याचा सल्ला दिला होता.
मात्र कधीकाळी वडील आणि चुलत्यांनी अत्यंत कष्टाने घेतलेल्या शेत जमिनीशी आमचे भावनिक नाते आहे. त्या बंजार बनलेल्या जमिनीस पिकवण्यासाठी आम्ही अनेक प्रयत्न केले. शेवटी तज्ञांच्या मार्गदर्शनाने सच्छिद्र निचरा प्रणालीचा उपयोग होऊन आमची शेत जमीन आता चांगली पिकते आहे, अशी भावनिक प्रतिक्रिया अजित सलगर यांनी व्यक्त केली.
तज्ज्ञांच्या सल्ल्याने जिद्दीने एकीने आणि अभ्यासूपणे उभारलेला हा प्रकल्प आवर्जून भेट देण्यासारखा आहे. शासनाच्या मदतीची प्रतीक्षा न करता बोरगावच्या सलगर बंधूंनी स्वखर्चाने उभारलेला सच्छिद्र निचरा प्रणाली प्रकल्प परिसरातील शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरतो आहे.