सांगली : सांगली जिल्ह्यातील खानापूर अवर्षणग्रस्त तालुका आहे. योजनेच्या पाण्यामुळे या भागातील शेतकरी अलीकडे बागायत शेतीकडे वळत आहेत. येथील सुलतानगादे गावचे प्रगतशील शेतकरी नेताजी जाधव यांनी पेरू पिकातून 5 लाखांचं उत्पादन घेतले आहे. वर्षानुवर्षे कोरडवाहू असणाऱ्या शेतीतून त्यांना पहिल्यांदाच पेरू पिकाच्या माध्यमातून भरघोस आर्थिक फायदा मिळाला आहे.
पदवीधर असलेल्या नेताजी जाधव यांनी नोकरीच्या मागे न लागता शेतीचा पर्याय निवडला. अनेक संकटांवर मात करत ते शेतीमध्ये नेहमी वेगवेगळे प्रयोग करत असतात. अलिकडे खानापूर भागात द्राक्ष व उसाचे प्रमाण वाढू लागले आहे. निसर्गावर मात करून कष्टाने पिकवलेल्या द्राक्षाला वातावरणाचा फटका मोठ्या प्रमाणात बसतो आहे. या भागात हक्काचा सहकारी साखर कारखाना नसल्याने ऊस घालवताना शेतकऱ्यांच्या नाकी नऊ येते. त्यामुळे ऊस आणि द्राक्षाला पर्याय म्हणून जाधव यांनी पेरू पिकाची निवड केली.
advertisement
नोकरीपेक्षा शेतीच भारी! 7 एकरात 70 लाख घेणार, युवा शेतकऱ्यानं सांगितला कमाईचा फॉर्म्युला!
अशी केली लागवड
एक एकर क्षेत्रात दोन वर्षांपूर्वी तैवान पिंक पेरूची लागवड केली. इंदापूर येथून प्रतिरोध 22 रुपये प्रमाणे रोपांची खरेदी केली होती. 9×5 अंतरावरती रोपांची लागवड केली आहे. एकूण 850 पेरूची झाडे लावली आहेत.
पेरू बागेत घेतले उडदाचे आंतरपीक
पेरूची रोपे लहान असताना आंतरपीक म्हणून उडदाची पेरणी केली होती. यातून त्यांना 4 क्विंटल उडदाचे उत्पादन मिळाले. यासह पेरू बागेस उडदाचे सेंद्रिय खत देखील मिळाले.
एकरात नऊ टन पेरू उत्पादन
झाडांची चांगली वाढ झाल्यावर त्यांनी पहिल्या वर्षी चार टनाचे उत्पादन घेतले. तर यंदा नऊ टनाचे उत्पन्न घेतले. त्यांना किलोला सरासरी 60 रुपये दर मिळाल्यामुळे 5 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. छाटणीपासून 1 लाख 70 हजार रुपये इतका उत्पादन खर्च झाला. तर 5 लाख 40 हजार रुपये उत्पन्न मिळाले.
अवर्षण प्रवण भागात रात्रंदिवस कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यास पेरू पिकाच्या माध्यमातून लाखांमध्ये नफा झाला. यामुळे नोकरीच्या मागे न लागता मातीत राबणाऱ्या पदवीधर शेतकऱ्यांना बळ मिळते आहे. 'इतर बागायती शेतीच्या तुलनेत, कमी पाण्यामध्ये अधिक आर्थिक उत्पन्न मिळवून देणारा फळ शेतीचा प्रयोग फायदेशीर' ठरत असल्याचे समाधान नेताजी जाधव यांनी व्यक्त केले.
'आम्ही शेतीमध्ये विविध पिके घेण्याचा प्रयोग केला होता. टोमॅटो व फुल शेतीमधून मोठ्या प्रमाणामध्ये पिकाचे उत्पन्न मिळत होते. परंतु हमखास दर मिळत नसल्याने नुकसान सोसावे लागत होते. मात्र पेरू लागवडीपासून आम्हाला चांगले उत्पन्न मिळते आहे. केरळ आणि आंध्र प्रदेश राज्यातील व्यापारी शेतात येऊन पेरू खरेदी करतात. त्यामुळे शेतकऱ्यास निर्यातीचा खर्च शून्य येतो' अशी प्रतिक्रिया प्रयोगशील शेतकरी नेताजी जाधव यांनी व्यक्त केली.