आत्महत्या थांबवण्यासाठी नवकल्पना
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना आळा घालण्याच्या उद्देशाने विनायक हेगाणा यांनी “शिवार फाउंडेशन” ची स्थापना केली. ही संस्था समुपदेशन, सल्ला, मार्गदर्शन आणि मदत या चतुःसूत्री तत्त्वावर कार्य करते. शेतकऱ्यांसाठी त्यांनी ८९५५७७१११५ हा हेल्पलाइन क्रमांक सुरू केला असून, राज्यभरातील शेतकऱ्यांना या माध्यमातून मानसिक आधार मिळत आहे.
३१ जिल्ह्यांमध्ये कार्यरत
संस्थापक विनायक हेगाणा सांगतात, “गेल्या आठ वर्षांपासून आम्ही ३१ जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहोत. आतापर्यंत १०,७५४ शेतकऱ्यांनी आमच्याशी संवाद साधला आहे. यातील १९८ निराश आणि आत्महत्येचा विचार करणाऱ्या शेतकऱ्यांना आम्ही समुपदेशनाद्वारे नव्या उमेदीने उभं केलं. आज हेच शेतकरी आपल्या जीवनासाठी लढत आहेत.”
advertisement
२४ तास सुरू असलेली सेवा
अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवर, ‘शिवार हेल्पलाइन’ची सेवा पूर्वी १६ तास चालत होती. मात्र, अलीकडील परिस्थिती पाहता ती आता २४ तास खुली करण्यात आली आहे. रात्री १० ते पहाटे ६ या वेळेतही शेतकरी या हेल्पलाइनवर संपर्क साधून आपली वेदना सांगतात. या वेळेत संपर्क करणारे शेतकरी मानसिकदृष्ट्या अधिक खचलेले असतात, असे हेगाणा सांगतात.
पुण्यातील नळस्टॉप परिसरात “शिवार हेल्पलाइन मार्गदर्शन केंद्र” नुकतेच सुरू करण्यात आले आहे. येथे प्रत्यक्ष येऊन शेतकऱ्यांना समुपदेशन व मार्गदर्शन दिले जाते.
अतिवृष्टीग्रस्तांसाठी आधार
गेल्या काही आठवड्यांत अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे पिकं, घरं आणि जनावरे वाहून गेली. या परिस्थितीत “शिवार हेल्पलाइन” शेकडो शेतकऱ्यांसाठी जीवनदायी ठरते आहे. फक्त एक फोन करून शेतकरी आपली परिस्थिती सांगतो आणि संस्था तात्काळ त्या भागातील स्वयंसेवक, मानसोपचारतज्ज्ञ किंवा सामाजिक संस्थांशी संपर्क साधते. त्यामुळे शेतकऱ्याला भावनिक आधारासोबत प्रत्यक्ष मदतीचं जाळं मिळतं.
“शेतकरी निराश होऊन खचू नयेत. कोणतंही संकट असो, आम्ही त्यांच्या सोबत आहोत. केवळ आम्हाला फोन करा, मनमोकळं बोला. आम्ही तुमच्या मदतीसाठी आणि समस्येचं समाधान शोधण्यासाठी सदैव तयार आहोत.” असा विश्वास हेगाणा यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.