सोलापूर : राज्यात एकेकाळी जळगाव जिल्हा केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध होता. मात्र आता हे चित्र वेगाने बदलत असून सोलापूर जिल्हा केळी उत्पादन आणि निर्यातीचे नवे केंद्र म्हणून उदयास येत आहे. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामुळे उपलब्ध झालेले मुबलक पाणी, अनुकूल हवामान आणि आधुनिक शेती पद्धती यांचा परिणाम म्हणून गेल्या पाच वर्षांत सोलापूर जिल्ह्यात केळी लागवडीत लक्षणीय वाढ झाली आहे. या वाढीबरोबरच केळी निर्यातीचा आलेखही सातत्याने वर चढताना दिसत आहे.
advertisement
गेल्या वर्षात सोलापूर जिल्ह्यातून तब्बल 39 हजार 727 कंटेनर केळीची निर्यात झाली असून या माध्यमातून सुमारे 4 हजार कोटी रुपयांचे परकीय चलन देशाला मिळाले आहे. हा आकडा केवळ जिल्ह्यासाठीच नव्हे तर राज्याच्या कृषी निर्यात क्षेत्रासाठीही महत्त्वपूर्ण मानला जात आहे. केळी उत्पादनातून शेतकऱ्यांना स्थिर उत्पन्न मिळू लागल्याने या पिकाकडे मोठ्या प्रमाणावर कल वाढला आहे.
निर्यातीची आकडेवारी काय सांगते?
पाच वर्षांतील निर्यातीची आकडेवारी पाहिली असता सोलापूर जिल्ह्यातील केळी व्यवसायाची प्रगती स्पष्टपणे दिसून येते. 2020-21 मध्ये 2 लाख 51 हजार 860 मेट्रिक टन केळीची निर्यात झाली होती. 2021-22 मध्ये हा आकडा वाढून 3 लाख 60 हजार 760 मेट्रिक टनांवर पोहोचला. 2022-23 मध्ये 5 लाख 72 हजार 544 मेट्रिक टन, तर 2023-24 मध्ये तब्बल 7 लाख 15 हजार 701 मेट्रिक टन इतकी निर्यात झाली. चालू 2024-25 वर्षात ही निर्यात 8 लाख 26 हजार 322 मेट्रिक टनांपर्यंत पोहोचल्याचे चित्र आहे. ही आकडेवारी जिल्ह्यातील केळी उत्पादनाचा वेगाने होत असलेला विस्तार दर्शवते.
सोलापूर जिल्ह्याचे हवामान केळी पिकासाठी अत्यंत पोषक असल्यामुळे येथे वर्षभर निर्यातक्षम केळीचे उत्पादन घेता येते. शेतकऱ्यांनी बाजारातील मागणी-पूरवठ्याचा अभ्यास करून लागवडीचा कालावधी ठरवावा आणि टप्प्याटप्प्याने लागवड करावी, असे मार्गदर्शन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. यामुळे दरातील चढ-उतारांचा परिणाम कमी होऊन शेतकऱ्यांचे नुकसान टाळता येते, असे उपविभागीय कृषी अधिकारी संजय वाकडे यांनी सांगितले.
60 टक्के केळी आखाती देशांत
सध्या जिल्ह्यात दरवर्षी सुमारे 15 लाख मेट्रिक टन केळीचे उत्पादन घेतले जाते. यापैकी 40 टक्के केळी स्थानिक बाजारपेठेत तसेच देशातील विविध राज्यांमध्ये विकली जाते. उर्वरित 60 टक्के केळीची निर्यात मुख्यत्वे आखाती देशांमध्ये केली जाते. दर्जेदार पॅकिंग, थंड साठवणूक व्यवस्था आणि जलद वाहतूक यामुळे सोलापूरची केळी परदेशी बाजारपेठेतही पसंतीस उतरत आहे.
करमाळा आणि माढा हे सोलापूर जिल्ह्यातील दोन तालुके आता केळीचे प्रमुख हब म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत. टेंभुर्णी परिसरात देशातील नामांकित केळी निर्यातदार कंपन्यांनी आपली कार्यालये सुरू केली असून संपूर्ण वर्षभर केळी उपलब्ध असल्याने निर्यातदारांना मोठा फायदा होत आहे. या केळी उद्योगामुळे थेट आणि अप्रत्यक्षरित्या सुमारे दहा हजार लोकांना रोजगार मिळाल्याने सोलापूर जिल्ह्याची ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक सक्षम होत आहे.
