संपूर्ण नुकसानभरपाई कधीच करू शकत नाही
धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागातील नुकसानीचा आढावा घेताना पटेल यांनी केलेले विधान वादग्रस्त ठरले आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले की, "सरकार शेतकऱ्यांना मदत करू शकते, पण संपूर्ण नुकसानभरपाई कधीच करू शकत नाही." शेतकऱ्यांना निसर्गाच्या प्रकोपाची सवय लावून घेणे भाग आहे, कारण हवामान बदल, पावसाची अनिश्चितता, दुष्काळ, गारपीट आणि अतिवृष्टी हे शेतजीवनाचा अविभाज्य भाग झाले आहेत.
advertisement
शेतकऱ्यांची नाराजी
सध्या मराठवाड्यासह अनेक भागांत शेतकरी अतिवृष्टीच्या तडाख्याने कोलमडून पडले आहेत. खरीप पिके मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाली असून पंचनामे करून मदतीची मागणी करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे नेते म्हणून ओळखले जाणारे पटेल यांनी "संकटाची सवय लावून घ्या" असे म्हणणे शेतकऱ्यांच्या जिव्हारी लागले आहे. शेतकरी संघटनांनी त्यांच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
विरोधकांचे आक्रमक होण्याचे संकेत
पाशा पटेल यांच्या या विधानावरून विरोधक अधिक आक्रमक होतील, असा अंदाज व्यक्त केला जातो. आधीच मदतीच्या घोषणांमध्ये विलंब आणि अपुरी नुकसानभरपाई यामुळे शेतकऱ्यांत असंतोष आहे. आता भाजप नेत्याचे हे विधान सत्ताधाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरू शकते.
सध्याची परिस्थिती
सध्या धाराशिवसह मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापूस, मका यांसारख्या पिकांचे उत्पादन धोक्यात आले आहे. शेतकरी सरकारकडे मदतीसाठी आशेने पाहत असताना नेत्यांकडून आलेले हे विधान वादाची ठिणगी ठरू शकते.