काय आहे योजना?
राज्यातील पीक विमा योजनेत झालेल्या त्रुटींमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. त्यात सुधारणा करत सरकारने नव्या आणि पारदर्शक पद्धतीने 'कृषी समृद्धी' योजना लागू केली आहे. ही योजना केवळ विमा संरक्षणापुरती मर्यादित नसून, भांडवली गुंतवणूक, संरक्षित शेती, आधुनिक तंत्रज्ञान आणि मूल्यसाखळी विकास यांसारख्या अनेक घटकांचा समावेश तिच्यात आहे.
क्लस्टर आधारित गटशेतीस प्रोत्साहन
advertisement
या योजनेअंतर्गत एकाच भागातील शेतकऱ्यांना गटशेतीसाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे. गटशेतीमुळे बियाणे, खते, सिंचन यंत्रणा, यांत्रिकीकरण, कोल्ड स्टोरेज आणि पॅक हाऊस यांसारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. या गटांना उत्पादन खर्चात बचत होईल आणि मार्केटिंग धोरणांतून फायदे मिळतील.
पारदर्शक अंमलबजावणी व थेट खात्यात अनुदान
योजनेची एक महत्त्वाची बाब म्हणजे कोणताही मध्यस्थ न ठेवता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट अनुदान जमा होणार आहे. पारदर्शकता राखण्यासाठी काटेकोर यंत्रणा तयार करण्यात आली असून, प्रत्येक लाभार्थ्याची ओळख निश्चित करण्यात येणार आहे.
कसले अनुदान मिळणार आणि कोण पात्र ठरणार?
या योजनेंतर्गत संरक्षित शेती (शेडनेट, पॉलीहाऊस, मल्चिंग), सिंचन सुविधा, यांत्रिकीकरण आणि मूल्यसाखळी विकासासाठी अनुदान दिले जाईल. तसेच विमा संरक्षणासाठी शेतकऱ्यांकडून नाममात्र प्रीमियम आकारण्यात येईल आणि उर्वरित रक्कम शासन भरून काढेल. जमीनधारक शेतकरी, गटशेती करणारे, उत्पादक कंपन्या, तसेच केंद्र शासनाच्या निकषांनुसार पात्र असणारे शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.