मुंबई : गेल्या काही वर्षांपासून रासायनिक खतांच्या वाढत्या किमतींमुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती डळमळीत होत आहे. प्रत्येक हंगामापूर्वी खतांच्या किमतीत होणारी वाढ शेतकऱ्यांच्या चिंता अधिकच वाढवते. यावर्षीही खतांच्या दरात मोठी वाढ झाली असून, शेतकऱ्यांचे उत्पादन खर्च प्रचंड वाढणार आहेत. अशा परिस्थितीत नवीन हंगामाचे नियोजन करताना शेतकऱ्यांना अक्षरशः नाकीनऊ येत असल्याची व्यथा त्यांनी व्यक्त केली आहे.
advertisement
रासायनिक खतांचे वाढते दर
उत्पादन वाढवण्यासाठी रासायनिक खतांचा वापर आजच्या शेतीचा महत्त्वाचा घटक बनला आहे. मात्र खत दरवाढीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानानंतरही, गेल्या काही वर्षांत खतांच्या किमती सातत्याने वाढत आहेत. परिणामी शेतकऱ्यांना पिकांचे उत्पादन करताना अधिक खर्च करावा लागत आहे.
यंदाही खतांच्या किमतीत गोणीमागे 200 ते 250 रुपयांची वाढ झाली आहे. काही खत प्रकारांमध्ये तर ही वाढ यापेक्षाही जास्त असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेत शेतमालाला योग्य भाव न मिळाल्याने हे वाढते खर्च शेतकऱ्यांसाठी अधिकच घातक ठरत आहेत.
शेतीमालाला कमी भाव
सध्या बाजारात कांदा, कापूस, भाजीपाला आणि इतर पिकांना अपेक्षित दर मिळत नाहीत. त्याचवेळी खत आणि कीटकनाशकांच्या किमतीत वाढ झाल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. उन्हाळी कांदा आणि इतर पिकांसाठी रासायनिक खतांचा वापर आवश्यक असल्याने शेतकऱ्यांकडे पर्याय नाही. तालुक्यांत अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी खत खरेदीसाठी दुकाने धुंडाळण्यास सुरुवात केली आहे. मात्र दुकानात गेल्यावर दरवाढीची माहिती समोर येताच त्यांचा संताप आणि नाराजी अधिकच वाढताना दिसत आहे.
जुन्नर तालुक्यातील खत विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार, कांदा पिकासाठी एकरी चार बॅग खतांची मागणी असते. मात्र प्रत्येक बॅगवर 200-250 रुपयांची वाढ झाल्याने शेतकऱ्यांचे उत्पादन खर्च आणखी वाढणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
खतांच्या जुन्या व नवीन दरांमधील बदल
खालील तक्त्यात सध्या प्रमुख खत प्रकारांमध्ये झालेली दरवाढ स्पष्ट केली आहे.
खत प्रकार जुना दर (₹) नवा दर (₹) वाढ (₹)
10:26:26 1850 2100 250
24:24:0 1700 1900 200
20:20:0 1300 1650 350
14:35:14 1800 1975 175
पोटॅश 1700 1900 200
दरम्यान, या दरवाढीतून स्पष्ट होते की काही खत प्रकारांमध्ये वाढ 350 रुपयांपर्यंत झाली आहे, जी थेट शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चावर परिणाम करणार आहे. खतांच्या मूळ किमतीत सातत्याने वाढ होत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक चक्र विस्कळीत झाले आहे. एकीकडे शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळत नाही, तर दुसरीकडे खत व कीटकनाशकांच्या वाढत्या किमतीमुळे ताण अधिक वाढत आहे.
