कसा उघड झाला घोटाळा?
2022-23 व 2023-24 या खरीप हंगामात पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शासनाकडून शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली होती. या अनुदानाचा लाभ मिळवण्यासाठी खरी शेतकरी यादी तयार करण्यात आली होती. मात्र, महसूल सहाय्यक अमोल भोई आणि प्रशिक्षणार्थी कर्मचारी गणेश चव्हाण यांनी खोटी नावे घालून बनावट यादी तयार केली.
advertisement
ही यादी चावडीवर लावल्यानंतर खरी शेतकरी मंडळी लाभार्थी यादीत नसल्याचे लक्षात आले. त्याऐवजी अशा लोकांना पैसे मिळाल्याचे दिसले, ज्यांच्याकडे जमीनच नाही. चौकशी केल्यावर हा घोटाळा उघडकीस आला.
अपहाराची रक्कम व आरोपींचा डाव
सुमारे 347 शेतकऱ्यांच्या नावावरून 1 कोटी 20 लाख रुपये बोगस लाभार्थ्यांच्या खात्यात टाकण्यात आले. या संपूर्ण प्रकारात तहसीलदारांच्या लॉगिन आयडीचा देखील गैरवापर करण्यात आल्याचे समोर येत आहे. यामुळे केवळ दोन आरोपींवरच नव्हे, तर आणखी काही जणांनी या प्रकरणात हातभार लावल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पोलिसांत गुन्हा दाखल
घोटाळ्याचा पर्दाफाश झाल्यानंतर संबंधित प्रकरण पाचोरा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक टप्प्यावर दोन आरोपींवर गुन्हा नोंदवला गेला असला, तरी तपासादरम्यान आरोपींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पोलिसांकडून या घोटाळ्यातील प्रत्येक लाभार्थ्यांची तपासणी सुरू असून निधी कसा व कुठे वळवला गेला याचा मागोवा घेतला जात आहे.
शेतकऱ्यांमध्ये संताप
सरकारकडून दिलेल्या नुकसानभरपाईवर डल्ला मारल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. खरीप हंगामात पिकांचे नुकसान झाल्यानंतर मदतीची अपेक्षा असलेल्या शेतकऱ्यांना फसवले गेल्याची भावना आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी असलेल्या निधीवरच गैरव्यवहार झाल्याने या प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. 347 शेतकऱ्यांचे 1 कोटी 20 लाख रुपये हडप झाल्याचा आरोप उघड झाल्याने शासनाने तत्काळ कारवाई करावी.अशी मागणी होत आहे.