खोताची वाडीची स्थापना सुमारे 18 व्या शतकाच्या उत्तरार्धात झाली असे मानले जाते. त्या काळात येथे जमीन असलेल्या खोत कुटुंबाच्या नावावरून या वाडीला खोताची वाडी असे नाव पडले. मुंबईच्या विकासाच्या सुरुवातीच्या काळात येथे मुख्यतः ईस्ट इंडियन समुदाय आणि कॅथलिक कुटुंबांनी आपले वास्तव्य केले. त्यांनी आपली पारंपरिक संस्कृती, सण आणि जीवनशैली या परिसरात टिकवून ठेवली.
advertisement
या वाडीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथील रंगीबेरंगी आणि पोर्तुगीज शैलीतील घरे. लाकडी बाल्कनी, कोरीव खिडक्या, अरुंद गल्ल्या आणि आकर्षक घरांची रचना ही या वाडीची ओळख बनली आहे. काही घरे शंभर वर्षांहून अधिक जुनी असून त्यांच्यावर पोर्तुगालच्या वास्तुशैलीचा प्रभाव दिसून येतो. त्यामुळे येथे फिरताना जणू जुन्या काळातील मुंबईचा अनुभव मिळतो.
आजही येथे पारंपरिक सण, विशेषतः ख्रिसमससारखे उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. स्थानिक रहिवासी आपल्या घरांची सजावट करून या वाडीचे सौंदर्य अधिक खुलवतात. त्यामुळे या परिसराला हेरिटेज व्हिलेज म्हणूनही ओळखले जाते.
झपाट्याने बदलणाऱ्या मुंबई शहरात खोताची वाडी ही इतिहास, वास्तुकला आणि संस्कृती यांचे सुंदर मिश्रण जपणारी एक अनमोल वारसा स्थळ म्हणून आजही विशेष महत्त्व राखून आहे.





