अमेरिकेतील सोयाबीन पेरणी क्षेत्रात घट
USDA च्या अंदाजानुसार, यंदा अमेरिकेतील सोयाबीन पेरणी क्षेत्र गेल्या वर्षाच्या तुलनेत सुमारे 62 लाख एकरांनी कमी आहे. जुलैच्या तुलनेत ऑगस्टमधील अंदाजात 25 लाख एकरांची कपात झाली आहे. तसेच यंदा उत्पादनातही जवळपास 2 टक्क्यांची घट अपेक्षित आहे, तर वापर 4.5 टक्क्यांनी वाढेल असा अंदाज वर्तवला गेला आहे. नव्या हंगामातील शिल्लक सोयाबीनचा साठा मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल 12 टक्क्यांनी कमी राहील.
advertisement
या घटत्या उत्पादन आणि साठ्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या बाजारात सोयाबीनच्या किमतीत वाढ झाली आहे. 9.96 डॉलर प्रति बुशेलवरून दर 10.41 डॉलरपर्यंत पोहोचले आहेत. तसेच सोयापेंडच्या किमतींमध्येही सुधारणा दिसून आली आहे. USDA च्या या अहवालामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी चढ-उतार नोंदवली गेली आहे.
दरम्यान, भारतातील परिस्थितीवर नजर टाकली तर सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (SOPA) सांगितले आहे की देशातील सोयाबीनचा शिल्लक साठा गेल्या वर्षाच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. मागील वर्षी हा साठा जवळपास 9 लाख टन होता, तर यंदा तो फक्त 3.5 लाख टनांवर स्थिरावेल अशी शक्यता आहे. म्हणजेच देशांतर्गत साठा जवळपास 40 टक्क्यांनी कमी झाला आहे. त्यामुळे नव्या हंगामातील उत्पादन किती होते, याकडे व्यापारी आणि प्रक्रिया उद्योगांचे लक्ष लागले आहे.
यावर्षी देशात सोयाबीनची पेरणीही घटली आहे. सरकारी आकडेवारीनुसार आतापर्यंत पेरणी 5 टक्क्यांनी कमी झाली आहे. मात्र, व्यापारी आणि उद्योग क्षेत्राचा अंदाज अधिक गंभीर असून त्यांच्या मते पेरणी किमान 10 ते 12 टक्क्यांनी घटली आहे. यामागील प्रमुख कारण म्हणजे गेल्या दोन हंगामात सोयाबीनच्या भावात आलेली घसरण. यंदा तर शेतकऱ्यांना हमीभावदेखील मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या लागवडीपासून काही प्रमाणात दूर राहण्याचा निर्णय घेतला.
सध्याचा बाजारभाव काय?
दरम्यान, देशात सोयातेल आणि सोयापेंडच्या भावात झालेली सुधारणा आणि कमी पेरणीमुळे सोयाबीनच्या भावाला आधार मिळाला आहे. सध्या प्रक्रिया प्लांट्समध्ये सोयाबीनचे दर 4,900 ते 5,050 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत, तर बाजार समित्यांमध्ये सरासरी भाव 4,600 ते 4,700 रुपये प्रतिक्विंटल इतके आहेत.
सोपाच्या मते देशातील शिल्लक साठा कमी राहणार असल्याने आणि USDA च्या अहवालानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या तेजीमुळे आगामी काळात सोयाबीनच्या दरात आणखी सुधारणा होऊ शकते. त्यामुळे शेतकरी, व्यापारी आणि निर्यातदारांचे लक्ष यंदाच्या नव्या हंगामातील उत्पादनावर केंद्रित झाले आहे.
एकूणच, आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत बाजारातील साठा घट, उत्पादन घट आणि वापर वाढ यामुळे सोयाबीन दरांना नव्याने गती मिळण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.