मुंबई : राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचं चित्र असलं तरी, आज (7 ऑगस्ट) महाराष्ट्रात पुन्हा हवामानात बदल होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या प्रमुख भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. अनेक जिल्ह्यांत हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला असून, शेतकऱ्यांनी सतर्क राहून खरीप पिकांची योग्य काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
advertisement
कोकण
मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे. कमाल तापमान 30-32°C, किमान 25-26°C च्या दरम्यान राहील. आर्द्रतेमुळे उकाडा जाणवण्याची शक्यता असल्याने नागरीकांनी काळजी घ्यावी.
मध्य महाराष्ट्र
पुणे, नाशिक, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत ढगाळ वातावरण राहील. तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज, तर घाटमाथ्यावर येलो अलर्ट जारी. तर पुणे, सातारा घाटमाथा, कोल्हापूर या भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता पुढील 2-3 दिवसांत आहे. पुण्यात तापमान 29-31°C, किमान 22-24°C दरम्यान राहील.
मराठवाडा
छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस, काही ठिकाणी विजांचा कडकडाट होण्याची शक्यता. जालना, बीड, हिंगोली, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये मान्सून येलो अलर्ट जारी. तापमान 30-33°C कमाल आणि 23-25°C किमान दरम्यान राहील.
विदर्भ
नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता, याठिकाणी हवामान विभागाचा येलो अलर्ट. अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ येथे तुलनेत पावसाची शक्यता कमी. तापमान कमाल 32-34°C, किमान 24-26°C दरम्यान राहील.
शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी?
वर्तमान हवामान लक्षात घेता शेतकऱ्यांनी विशेषतः सोयाबीन, भात व तूर पीकांमध्ये पाणी साचू नये याची दक्षता घ्या. तसेच कीड व बुरशीजन्य रोगांपासून संरक्षणासाठी पीक निरीक्षण करा. गरज असेल, तर पीकांना रोगनियंत्रक फवारणी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार करा. अतिवृष्टीच्या शक्यतेने रोपांची मुळे उघडी पडणार नाहीत याची काळजी घ्या. तसेच शक्य असल्यास, सेंद्रिय खतांचा वापर करून जमिनीचा पोत सुधारवा.
दरम्यान, राज्यात हवामान पुन्हा बदलण्याच्या मार्गावर आहे. पावसाचा अनिश्चित स्वरूप आणि येलो अलर्टमुळे शेतकरी, विशेषतः खरीप पीक घेणारे त्यांनी हवामान विभागाच्या सूचना लक्षपूर्वक पाळाव्यात.