वडिलोपार्जित मालमत्तेची व्याख्या
हिंदू वारसा अधिनियम १९५६ नुसार, चार पिढ्यांपर्यंत वारशाने मिळालेली मालमत्ता वडिलोपार्जित मानली जाते. म्हणजेच वडील, आजोबा किंवा पणजोबांकडून आलेली जमीन-जुमला, घर किंवा इतर संपत्ती ही वडिलोपार्जित ठरते. अशा मालमत्तेवर सर्व कायदेशीर वारसांचा समान हक्क असतो.
दाव्याचा अधिकार कोणाला?
पूर्वी मुलींना या मालमत्तेवर हक्क नव्हता, मात्र २००५ मध्ये कायद्यात दुरुस्ती झाल्यानंतर मुलींचाही समान हक्क मान्य झाला आहे. त्यामुळे आता मुलं, मुली, नातवंडे हे सर्व आपल्या हक्काचा दावा करू शकतात. विवाहित आणि अविवाहित मुलींना यात कोणताही भेदभाव केला जात नाही.
advertisement
दावा कसा करावा?
हक्क स्पष्ट करणे : सर्वप्रथम सदर मालमत्ता वडिलोपार्जित आहे की स्वतः कमावलेली (स्वअर्जित) आहे, हे निश्चित करावे.
कागदपत्रे गोळा करणे : सातबारा उतारा, मालकीहक्काचे पुरावे, वारसांचे दाखले, मृत्यू दाखले यासारखी सर्व कायदेशीर कागदपत्रे गोळा करावीत.
वाटणीसाठी अर्ज : मालमत्तेचे वारसांमध्ये विभाजन न झाल्यास वारसाहक्कासाठी स्थानिक तहसील कार्यालयात किंवा न्यायालयात अर्ज करता येतो.
नागरी दावा दाखल करणे : जर वाटणीवर वाद असेल, तर संबंधित नागरी न्यायालयात दावा दाखल करावा लागतो. न्यायालय योग्य पुरावे तपासून वारसांना त्यांच्या वाट्याचा हिस्सा देण्याचा आदेश देते.
मध्यस्थीचा मार्ग
अनेकदा कुटुंबातील वाद न्यायालयापर्यंत पोहोचण्याआधी तोडगा काढणे शक्य असते. यासाठी मध्यस्थी (mediation) ही प्रभावी पद्धत आहे. वाद टाळून परस्पर संमतीने वाटणी केली तर वेळ आणि खर्च दोन्ही वाचतात.
या गोष्टी नक्की लक्षात ठेवा
वडिलोपार्जित मालमत्तेतील हिस्सा कोणीही विकू किंवा दान करू शकत नाही, जोपर्यंत सर्व वारसांची संमती मिळत नाही. जर कोणत्याही वारसाने आपला हिस्सा सोडला, तर तो इतर वारसांकडे जातो. अल्पवयीन वारसांनाही हक्क असतो आणि त्यांच्या वतीने पालक दावा करू शकतात.
कायदेशीर मदत घेणे आवश्यक
मालमत्ता वादांमध्ये तज्ज्ञ वकिलांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. कारण जमिनीची कागदपत्रे, वारसांचे हक्क आणि कायद्यातील गुंतागुंत लक्षात घेता, सामान्य व्यक्तीला याची योग्य जाण नसते.