Jalna News: फोटो काढायला गेले अन् जिवाला मुकले, जालन्यात खदाणीत बुडून दोन मित्रांचा दुर्दैवी अंत
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
पोहण्यासाठी खदाणीत गेलेल्या दोन तरुणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाल्याची धक्कादायक घटना जालन्यात घडली आहे.
जालना: पोहण्यासाठी खदाणीत गेलेल्या दोन तरुणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाल्याची धक्कादायक घटना जालन्यात घडली आहे. शहराला लागून असलेल्या वडारवाडी शिवारात चार मित्र फोटो काढण्यासाठी गेले होते. फोटो काढून झाल्यावर ते पोहण्यासाठी पाण्यात उतरले. परंतु यातील दोघांना पोहता येत नसल्याने ते खोलवर बुडाले. सिद्धार्थ संजय हरबळे (वय 16, रा. समर्थनगर, जालना) आणि जसमीतसिंग रिहाल (वय 18, रा. संभाजीनगर, जालना) अशी मृत्यू झालेल्या दोन्ही तरुणांची नावे आहेत.
शनिवारी दुपारी समर्थनगर आणि संभाजीनगर येथील चार मित्र वडारवाडी शिवारातील जेल परिसराजवळील खडकतलाव खदानीत पोहण्यासाठी गेले होते. पावसाळ्यामुळे खदानीत मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले होते. सुरुवातीला चौघांनी परिसरात फोटोसेशन केले. त्यानंतर सर्वजण पाण्यात उतरले. यातील दोघांना पोहता येत होते, मात्र सिद्धार्थ हरबळे आणि जसमीतसिंग रिहाल या दोघांना पोहता न आल्याने ते पाण्यात खोलवर गेले आणि बुडाले.
advertisement
मित्रांची मदतीसाठी धावपळ
घटनास्थळी उपस्थित असलेल्या त्यांच्या दोन मित्रांनी आरडाओरडा करत गावात धाव घेतली. गावातील काही तरुण तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि पाण्यात शोध घेऊन सिद्धार्थ व जसमीतसिंगला बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झालेला होता. घटना समजताच गावकरी तसेच नातेवाईक घटनास्थळी धावले. एकाच वेळी दोन तरुणांचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली.
advertisement
पोलिसांचा पंचनामा आणि पुढील कार्यवाही
माहिती मिळताच तालुका पोलिस ठाण्याचे कर्मचारी मदन गायकवाड, सचिन आर्य आणि डी.सी. मेहेत्रे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस शिपाई मदन गायकवाड करीत आहेत.
advertisement
दरम्यान, सिद्धार्थ संजय हरबडे 9 वी ला कोठारी इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये शिकत होता. तो डॉ. संजय हरबडे यांचा एकुलता एक मुलगा होता. डॉ. संजय हरबळे हे परभणी येथे जिल्हा रुग्णालयात आरोग्य अधिकारी आहेत. तर जसमीतसिंग गुरुदीप सिंग हा इयत्ता 11 वी त जे.ई.एस. महाविद्यालय येथे शिकत होता. त्याचे वडील स्टील कंपनीत काम करतात. त्यांना दोन मुले आहेत. मृत झालेला मोठा मुलगा होता.
advertisement
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
September 13, 2025 9:47 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
Jalna News: फोटो काढायला गेले अन् जिवाला मुकले, जालन्यात खदाणीत बुडून दोन मित्रांचा दुर्दैवी अंत