20चा साबण, 10 रुपयांचं बिस्किट; किंमत कमी होणार नाही, कंपन्यांच्या निर्णयावरून चर्चा तापली, मोठा ट्विस्ट
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
GST Small Packs: जीएसटी कपातीनंतर एफएमसीजी कंपन्यांनी छोट्या पॅक्सच्या किमती कमी न करता त्यातील वजन वाढवण्याचा फॉर्म्युला अवलंबला आहे. ग्राहकांना आता त्याच किमतीत जास्त माल मिळणार असून अप्रत्यक्ष फायदा होणार आहे.
मुंबई: मोदी सरकारने नुकतीच ‘जीएसटी’ रचनेत मोठी सुधारणा केली आहे. बिस्किटे, साबण आणि टूथपेस्टसारख्या रोजच्या वापरातील वस्तूंवरील कर कमी करण्यात आला आहे. यामुळे ग्राहकांना थेट कमी किमतीत वस्तू मिळतील अशी अपेक्षा होती. पण मोठ्या एफएमसीजी (FMCG) कंपन्यांनी स्पष्ट केले आहे की- 5,10 आणि 20 रुपयांच्या छोट्या पॅक्सच्या किमती कमी होणार नाहीत.
advertisement
यामागचे कारण असे आहे की, ग्राहक या ठरलेल्या किमतींमध्ये वस्तू विकत घेण्यास सरावले आहेत. जर किमती 9 किंवा 18 रुपये अशा विचित्र आकड्यांवर आल्या तर ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. या गोष्टीचा विक्रीवर परिणाम होऊ शकतो, असे कंपन्यांचे म्हणणे आहे.
advertisement
कंपन्यांचा नवा फॉर्म्युला: वजन वाढणार
टॅक्स कपातीचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कंपन्यांनी एक वेगळा मार्ग निवडला आहे. 'ईटी नाऊ'च्या एका अहवालानुसार कंपन्या आता किंमत कमी करण्याऐवजी पॅकच्या आतील वस्तूंचे प्रमाण वाढवत आहेत. याचा अर्थ 20 रुपयांच्या बिस्किट पॅकमध्ये पूर्वीपेक्षा जास्त बिस्किटे मिळतील किंवा 10 रुपयांच्या साबणाचे वजन थोडे वाढेल.
advertisement
बिकाजी फूड्सचे सीएफओ ऋषभ जैन यांनी सांगितले की- छोट्या 'इम्पल्स पॅक्स'मध्ये वजन वाढवले जाईल. जेणेकरून ग्राहकांना जास्त फायदा मिळेल. त्याचप्रमाणे डाबरचे सीईओ मोहित मल्होत्रा यांनी सांगितले की, टॅक्स कपातीचा फायदा ग्राहकांपर्यंत नक्कीच पोहोचवला जाईल आणि यामुळे मागणीही वाढेल.
advertisement
सरकारची नजर आणि ग्राहकांचा फायदा
अर्थ मंत्रालय या संपूर्ण बदलावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, कंपन्यांनी टॅक्समुळे होणारी बचत स्वतःकडे ठेवू नये, तर ती ग्राहकांपर्यंत पोहोचवावी. यासाठी लवकरच मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली जाऊ शकतात.
advertisement
जरी ग्राहकांना पॅकवर लिहिलेल्या किमतीत मोठा फरक दिसणार नसला तरी त्यांना त्याच किमतीत पूर्वीपेक्षा जास्त सामान मिळेल. त्यामुळे अप्रत्यक्षपणे ग्राहकांचाच फायदा होणार आहे.
टॅक्स सुधारणा आणि ग्राहक व्यवहार
तज्ज्ञांचे मत आहे की, ग्राहकांच्या सवयी आणि बाजारातील वास्तविकता लक्षात घेता हा निर्णय योग्य आहे. छोटे पॅक्स हे 'इम्पल्स बाय' (Impulse Buy) असतात. म्हणजे ग्राहक जास्त विचार न करता लगेच ते विकत घेतात. अशा परिस्थितीत किंमत बदलल्यास ग्राहकांचा विश्वास तुटू शकतो.
advertisement
'जीएसटी' स्लॅब कमी करणे आणि प्रणाली सोपी करण्याचा उद्देश सामान्य माणसाला दिलासा देणे आहे. जरी हा दिलासा किंमत कमी होण्याच्या स्वरूपात दिसत नसला तरी, वस्तूंचे प्रमाण वाढल्याने ग्राहकांना नक्कीच जास्त व्हॅल्यू मिळेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 13, 2025 10:31 PM IST
मराठी बातम्या/मनी/
20चा साबण, 10 रुपयांचं बिस्किट; किंमत कमी होणार नाही, कंपन्यांच्या निर्णयावरून चर्चा तापली, मोठा ट्विस्ट