मुंबई : जमीन, घर किंवा कोणतीही स्थावर मालमत्ता खरेदी करताना सर्वात महत्त्वाचा आणि कायदेशीर दस्तऐवज म्हणजे खरेदी खत. हेच दस्तऐवज एखाद्या मालमत्तेचा मालकी हक्क कोणाकडे आहे, याचा प्राथमिक आणि अधिकृत पुरावा मानला जातो. कोणत्याही स्थावर मालमत्तेचा व्यवहार पूर्ण झाल्याचे कायदेशीर मान्यत्व खरेदी खतामुळेच मिळते. त्यामुळे जमीन किंवा घर खरेदी-विक्री करताना खरेदी खताची प्रक्रिया समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
advertisement
खरेदी खत झाल्यानंतरच मालमत्तेचा हक्क विक्रेत्याकडून खरेदीदाराकडे हस्तांतरित होतो. या दस्तऐवजात व्यवहाराची तारीख, खरेदीदार व विक्रेत्यांची नावे, मालमत्तेचे क्षेत्रफळ, व्यवहाराची रक्कम, मालमत्तेचे स्वरूप आणि इतर महत्त्वाच्या अटींचा तपशील नमूद केलेला असतो. एकदा हे खरेदी खत दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदवले की, त्यानंतर त्या माहितीच्या आधारे फेरफार प्रक्रिया सुरू होते आणि सातबारा उताऱ्यावर नवीन मालकाचे नाव नोंदवले जाते.
खरेदी खत करण्याची प्रक्रिया
मालमत्तेचा व्यवहार ठरल्यावर सर्वप्रथम संबंधित जमिनीचा किंवा घराचा सरकारी दर (Government Valuation) किती आहे, हे दुय्यम निबंधक कार्यालयातून तपासले जाते. त्याचवेळी खरेदीदाराने बाजारभावानुसार त्या मालमत्तेचे मूल्यांकन (Market Value) करणे गरजेचे असते. सरकारी दर आणि बाजारभाव यामधील कोणत्या रकमेवर रजिस्ट्री करायची, यावर खरेदीदार आणि विक्रेता दोघांनी परस्पर संमतीने निर्णय घ्यायचा असतो.
उदाहरणार्थ, एखाद्या घराचा सरकारी दर 20 लाख रुपये आणि बाजारभाव 30 लाख रुपये असल्यास, रजिस्ट्री 20 लाखांवर किंवा 30 लाखांवर करायची, हे दोन्ही पक्ष ठरवतात. ज्या रकमेवर रजिस्ट्री केली जाते, त्याच रकमेवर मुद्रांक शुल्क आणि नोंदणी फी आकारली जाते.
आवश्यक कागदपत्रे कोणती?
खरेदी खतासाठी मालमत्तेचे जुने सर्व कागदपत्रे आवश्यक असतात. त्यामध्ये सातबारा उतारा, फेरफार नोंदी, विक्रेता व खरेदीदारांचे आधार व पॅन कार्ड, फोटो, मुद्रांक शुल्क व नोंदणी फी भरल्याच्या पावत्या, दोन साक्षीदारांचे ओळखपत्र तसेच एनए (NA) आदेशाची प्रत यांचा समावेश असतो.
खरेदी खत करताना कोणती काळजी घ्यायची?
खरेदी खत करण्यापूर्वी विक्रेत्याला व्यवहाराची संपूर्ण रक्कम अदा झालेली असावी. एकदा खरेदी खत नोंदवले गेले की, मालमत्तेचा संपूर्ण हक्क खरेदीदाराकडे जातो. जर खरेदीदार बँक कर्जाच्या माध्यमातून मालमत्ता घेत असेल, तर बँकेकडून मंजूर रकमेचा चेक किंवा लेखी हमी मिळाल्याशिवाय खरेदी खत करू नये.
रजिस्ट्री रद्द होऊ शकते का?
दस्त नोंदणी झाल्यानंतर तलाठी फेरफार प्रक्रिया सुरू करतात. ग्रामीण भागात या प्रक्रियेदरम्यान हरकत नोंदवण्यासाठी नोटीस दिली जाते. ठरावीक कालावधीत कोणतीही हरकत आली नाही, तर फेरफार मंजूर होतो आणि सातबारा उताऱ्यावर नाव लागते. मात्र, व्यवहारातील रक्कम न मिळणे, वारसांचा किंवा हिस्सेदारांचा आक्षेप असल्यास रजिस्ट्री थांबवली जाऊ शकते. अशा प्रकरणात तहसीलदार व मंडळ अधिकारी चौकशी करतात. खरेदी खत पूर्णपणे रद्द करायचे असल्यास न्यायालयीन मार्गच अवलंबावा लागतो.
