यंदाच्या मौनी अमावस्येला ग्रहस्थितीमुळे खास योग जुळून आले आहेत. पौष अमावस्येच्या पार्श्वभूमीवर सर्व कार्यसिद्धीसाठी उपयुक्त असा सर्वार्थ सिद्धी योग तयार होत असून, आनंद आणि सौभाग्य देणारा हर्षण योगही या दिवशी प्रभावी राहणार आहे. या शुभ योगांमुळे मौनी अमावस्येचे आध्यात्मिक तसेच ज्योतिषीय महत्त्व अधिक वाढले आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, या दिवशी राशीनुसार काही खास उपाय केल्यास पितृदोष कमी होतो, पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि जीवनातील अडथळे दूर होण्यास मदत होते.
advertisement
मेष आणि वृश्चिक राशी
मेष आणि वृश्चिक या दोन्ही राशींचा स्वामी मंगळ ग्रह आहे. या राशीच्या व्यक्तींनी मौनी अमावस्येच्या दिवशी गरजू व गरीब लोकांना शेंगदाणे, तीळ, गूळ, धान्य व फळे दान करावीत. तसेच मुंग्यांना साखर खाऊ घालणे शुभ मानले जाते. या उपायांमुळे मानसिक तणाव कमी होतो आणि आत्मविश्वास वाढतो.
वृषभ आणि तूळ राशी
वृषभ व तूळ राशींचा स्वामी शुक्र ग्रह असल्याने या राशीच्या लोकांनी मौनी अमावस्येला तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ते घरातील एखाद्या सुरक्षित, गुप्त ठिकाणी ठेवावे. सकाळ-संध्याकाळ तुळशीची पूजा करावी. याशिवाय पांढरे वस्त्र, तांदूळ, दूध, साखर किंवा मोती दान केल्यास वैवाहिक सुख आणि आर्थिक स्थैर्य वाढते.
मिथुन आणि कन्या राशी
मिथुन व कन्या राशीचा स्वामी बुध आहे. या राशीच्या लोकांनी मौनी अमावस्येच्या दिवशी शिवलिंगावर जलाभिषेक करावा आणि ‘ॐ नमः शिवाय’ मंत्राचा जप करावा. गाईला हिरवा चारा द्यावा आणि संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला पूर्वजांच्या स्मरणार्थ दिवा लावावा. यामुळे बुद्धी, व्यवसाय आणि शिक्षण क्षेत्रात प्रगती होते.
कर्क राशी
कर्क राशीचा स्वामी चंद्र असल्याने या दिवशी कच्च्या दुधाने घर स्वच्छ करणे शुभ मानले जाते. तांदूळ, दूध आणि पांढरे तीळ दान करावेत. संध्याकाळी ‘ॐ सोम सोमाय नमः’ या मंत्राचा जप करत चंद्राला पाणी अर्पण केल्यास मानसिक शांती आणि भावनिक स्थैर्य लाभते.
सिंह राशी
सिंह राशीचा स्वामी सूर्य देव आहे. या राशीच्या लोकांनी मौनी अमावस्येला गरजू व्यक्तींना गहू, लाल वस्त्र आणि गूळ दान करावा. तांब्याच्या भांड्यातून सूर्याला अर्घ्य देऊन प्रार्थना करावी. यामुळे समाजात मान-सन्मान वाढतो आणि पितरांचे आशीर्वाद प्राप्त होतात.
धनु आणि मीन राशी
धनु व मीन राशींचा स्वामी गुरू ग्रह आहे. या राशीच्या लोकांनी नदी किंवा तलावात पूर्वजांच्या नावाने दिवा सोडावा आणि संत किंवा गरजू व्यक्तींना अन्न व वस्त्र दान करावे. यामुळे भाग्यवृद्धी होते.
मकर आणि कुंभ राशी
मकर व कुंभ राशींचा स्वामी शनि असल्याने या राशीच्या व्यक्तींनी मौनी अमावस्येला काळे तीळ, काळे कपडे, शुद्ध तूप किंवा पादत्राणे दान करावीत. तसेच कडुलिंबाच्या झाडाला पाणी घालणे शुभ मानले जाते. या उपायांमुळे शनीदोष कमी होऊन जीवनातील अडथळे दूर होतात.
(सदर बातमी फक्त महितीकरिता असून न्यूज १८ मराठी कुठलाही दावा करत नाही)
