एकाच तालुक्यातील 21 विद्यार्थी
नवोदय विद्यालयाच्या परीक्षेत ठाणे ग्रामीणसाठीच्या 30 जागांसाठी 23 विद्यार्थ्यांनी यश मिळवलं. विशेष म्हणजे यामध्ये केवळ शहापूर तालुक्यातील 21 विद्यार्थी आहेत. तर मुरबाड आणि भिवंडी तालुक्यातील प्रत्येकी 1 विद्यार्थी यशस्वी ठरले आहेत. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी विशेष कौतुक केले आहे. तसेच, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी विद्यार्थ्यांसह त्यांचे पालक, शिक्षक आणि मार्गदर्शकांचे अभिनंदन केले आहे.
advertisement
MS धोनीला बॅटिंग जमेना, थालासोबत असं का घडतंय? काय आहे कारण?
दरम्यान, विद्यार्थ्यांनी मिळवलेलं हे यश विद्यार्थ्यांच्या मेहनतीसोबतच पालकांचा पाठिंबा, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि शाळेतील वातावरण यामुळे शक्य झाला आहे. या विद्यार्थ्यांना नवोदय विद्यालयात उत्तम शिक्षण मिळणार असून, त्यांचे उज्ज्वल भविष्य घडणार आहे.
ठाणे, पालघरसाठी 80 जागा
ठाणे आणि पालघर जिल्ह्यासाठी नवोदय विद्यालयात 80 जागा असतात. त्यापैकी 60 ग्रामीण आणि 20 शहरी विद्यार्थ्यांसाठी असतात. यातील ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागासाठी 30 जागा असून शहरी भागासाठी 10 जागा आहेत. संपूर्ण ठाणे जिल्ह्यासाठीच्या 30 जागांमध्ये 23 विद्यार्थ्यांनी यश मिळवले असून जिल्ह्यासाठी हे अभिमानास्पद आहे.
नवोदय विद्यालय म्हणजे काय?
भारतातील हुशार आणि होतकरू विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी सरकारने जवाहर नवोदय विद्यालयांची स्थापना केली आहे. येथे इयत्ता 6 वीपासून 12 वीपर्यंत सी.बी.एस.ई. पॅटर्नवर मोफत शिक्षण दिले जाते. त्यामुळे दरवर्षी या शाळेत प्रवेश घेण्यासाठी हजारो विद्यार्थी प्रयत्न करतात.