कोल्हापूर : आपण दैनंदिन कामे करताना किंवा आवड म्हणून गाणी गुणगुणत असतो. पण बऱ्याच जणांच्या आत एखादा गायक किंवा वादक दडलेला असतो. फक्त अधिकृत शिक्षण घेतले नसल्याने ती त्या कला नीट घडवली गेली नसते. त्यासाठीच कोल्हापूरची एक संगीत, नृत्य आणि नाट्य विश्वातील संस्था कार्यरत आहे. गेल्या कित्येक दशकांपासून अनेक कलांच्या शिक्षणापासून प्रत्यक्ष सादरीकरणापर्यंत विविध सुविधा एकाच छताखाली देणारे भव्य कलासंकुल म्हणजे देवल क्लब बनले आहे. या ठिकाणी संगीत, नृत्य, वादन यांच्यासाठीचे यंदाचे प्रवेश सुरू झाले आहेत.
advertisement
कोल्हापुरातील अत्यंत जुनी आणि नावाजलेली संस्था असलेल्या गायन समाज देवल क्लबमध्ये अभिजात हिंदुस्थानी संगीत, नृत्य व नाट्य यांचे प्रशिक्षण दिले जाते. त्याचबरोबरीने नवोदित, उदयोन्मुख कलाकारांसह सांगीतिक कार्यक्रमांचे आयोजन देखील वर्षभर केले जाते. 1883 साली 'करवीर गायन समाज' या संस्थेची स्थापना झाल्यानंतर 1893 मध्ये बाबा देवल यांनी एक खोली भाड्याने घेऊन गाण्याचे कार्यक्रम सुरू केले होते.
World Eye Donation Day 2024 : कोण कोण करू शकते दृष्टीदान; पाहा काय आहे नियमावली?
जागा अपुरी पडू लागल्याने कोल्हापुरच्या सध्याच्या दैवज्ञ बोर्डिंगमागे लुकतुकेंच्या माडीवर गाण्यांच्या मैफली रंगू लागल्या. बाबा देवल तेथेच राहू लागले. गाण्याच्या वेडामुळे एकत्र येण्याच्या या जागेला ‘देवल क्लब’ म्हणून ओळख मिळाली. 1946 मध्ये 'करवीर गायन समाज' आणि 'देवल क्लब' यांचे एकत्रित मिळून ‘गायन समाज देवल क्लब’ असे नामकरण करण्यात आले. पुढे हळूहळू अनेक प्रयत्नांनी सध्याची देवल क्लबची वास्तू निर्माण झाली, असे गायन समाज देवल क्लबचे व्यवस्थापक उदय जाधव यांनी सांगितले आहे.
कशा पद्धतीचे दिले जाते शिक्षण?
देवल संगीत विद्यालय या ठिकाणी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या पूर्ण अभ्यासक्रमानुसार प्रारंभिक ते विशारद पर्यंतच्या सर्व परीक्षांचा अभ्यास घेतला जातो. यामध्ये गायन, सतार, व्हायोलिन, हार्मोनियम, तबला, कथ्थकनृत्य, भरतनाट्यम, बासरी ह्या विषयांचे शिक्षण दिले जाते. गेली कित्येक दशके ही संगिताचे शिक्षण देण्यासाठी संस्था कार्यरत आहे. अनेक प्रथितयश शिक्षक या ठिकाणी शिकवण्यासाठी असतात.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मोफत शिका योग, कोल्हापुरात भरणार 7 दिवस वर्ग
अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या ऑक्टोबर आणि एप्रिल अशा दोन सत्रात परीक्षा येथे घेतल्या जात असून या ठिकाणचे सेंटरही खूप मोठे आहे. रोज संध्याकाळी साडे पाच, साडे सहा आणि साडे सात अशाप्रकारे आठवड्यातून तीन दिवस एक एक तास वर्ग भरले जातात. प्रत्येक सत्रात जवळपास 140 विद्यार्थी कार्यरत असतात. तर यामध्ये सर्व विषयांच्या परिक्षा या ठिकाणी घेतल्या जातात, असेही जाधव यांनी सांगितले.
कोण आणि कसे घेऊ शकते प्रवेश?
जर कुणाला गायनाचे अधिकृत शिक्षण घ्यायचे असेल तर त्यांना त्याची आवड महत्वाची असते आणि प्रवेश फी बरोबर एक साधा प्रवेश फॉर्म भरून या ठिकाणी प्रवेश मिळवता येतो. याठिकाणी पहिल्या वर्षी 750 रुपये प्रति महिना, दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी 850 रुपये प्रति महिना, चौथ्या पाचव्या वर्षाला 1,000 रुपये प्रति महिना आणि सहाव्या व सातव्या वर्षाला 1250 रुपये प्रति महिना अशी फी असते. गायनाचा सात वर्षांचा अभ्यासक्रम असतो. पण सात वर्षांत हळूहळू अभ्यासक्रम वाढत जात असल्याने तो सहसा इतक्या वेळेत पूर्ण होत नाही, असेही जाधव यांनी सांगितले.
आजवर कित्येक मोठ्या कलाकारांची सुरुवात या गायन समाज देवल क्लबमधूनच झाली आहे. तर आजतागायत संगीत क्षेत्राला अनेक उत्तम कलाकार देण्याचे काम देवल क्लब ही संस्था करत आली आहे. त्यामुळे संगीताच्या शिक्षणाची आवड असणाऱ्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी प्रवेश घेऊन आपली आवड जपावी, असे आवाहन देखील जाधव यांनी केले आहे.





