कोल्हापूर : सोशल मीडिया हे एक मायाजाळ असल्याचं म्हटलं जातं. बरेच जण या सोशल मीडियावर प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी प्रयत्न करत असतात. त्यात आजकाल काहीजण कंटेंट क्रिएशनकडेच आपला उत्पन्नाचा स्त्रोत म्हणून पाहत आहेत. मात्र सोशल मीडियावर कंटेंट क्रिएटर म्हणून पैसा कमावणे सध्या तितके सोपे राहिलेले नाही. नवख्या तरुण तरुणींनी याकडे बघताना पर्यायी मार्ग म्हणूनच पाहिले पाहिजे, असे अनुभवाचे बोल कोल्हापूरच्या एका कंटेंट क्रिएटरने सांगितले आहेत.
advertisement
सुनयना कोथळे या हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतलेल्या कोल्हापुरच्या तरुणीने नुकतेच स्वतःचे एक चहा नाश्त्याचे हॉटेल सुरु केले आहे. पण याआधी तिने स्वतःचे करिअर एक सोशल मीडिया इन्फ्लुएंसर म्हणूनच सुरू केले होते. पण पाहिजे तितके पैसे तिला सोशल मीडियाच्या माध्यमातून कमावता आले नाहीत. मागची काही वर्षे यासाठी खर्च केल्यानंतर शिक्षण ज्या क्षेत्रात झाले आहे, त्यातच आपला व्यवसाय सुरू करण्याचे तिने ठरवले आणि स्वतःचे हॉटेल सुरू केले.
मिसळप्रेमी कोल्हापुरात थालीपीठ खायला गर्दी, महिला विकतेय तब्बल 13 प्रकार
सोशल मीडियावर कशी झाली सुरुवात?
सोशल मीडियावर व्हिडिओ करुन टाकल्याने भरपूर पैसे मिळतात, असाच काहीसा समज इतरांप्रमाणे सुनैनाचाही झाला होता. खरंतर हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेताना शारीरिक त्रासामुळे तिला हॉटेलिंग क्षेत्र सोडावे लागले होते. त्यानंतर सुरुवातीलाच सुनयनाच्या बाबतीत एक स्तुत्य घटना घडली होती. कोल्हापूर महानगरपालिका वाहतूक बसमधून प्रवास करताना ड्रायवर आणि कंडक्टर यांनी चांगल्या मनाने अनपेक्षित मदत केली होती. त्यावेळी त्याचा व्हिडिओ सुनयनाने सोशल मीडियावर टाकला होता. त्यामुळेच तिला प्रसिद्धी मिळत केली. पुढे सोशल मीडियावरच कंटेंट करून पोस्ट करण्यावर भर दिल्याचे सूनयना सांगते.
कशा पद्धतीने बसवला होता मेघडंबरीवरील छत्रपती शिवरायांचा पुतळा? पाहा रोमांचकारी अनुभव
सोशल मीडियावर अजूनही करते कंटेंट क्रिएशन
सुनयना ही सुरुवातीपासूनच कोल्हापुरी भाषेतील व्हिडीओ बनवते. बघणाऱ्या लोकांनाही तिचे अस्सल कोल्हापूरी रांगड्या भाषेतील बोलणे आवडते. त्यामुळे ती वेगवेगळे लाईफस्टाईल ब्लॉग बनवते. त्याबरोबरच कॉमेडी कंटेंट आणि प्रमोशनल व्हिडीओ देखील ती बनवते. सध्या सुनयनाच्या युट्यूब चॅनलला 45 हजारांवर सबस्क्राईबर्स, फेसबुकवर 10 हजारांवर तसेच इंस्टावर 1 लाख 35 हजारांवर फॉलोअर्स आहेत.
दरम्यान, सुनयना ही केवळ एक उदाहरण आहे. सोशल मीडियावर इतके सबस्क्राईब फॉलोवर्स असतानाही पुरेसे पैसे त्यातून मिळवणे शक्य नव्हते. त्यामुळेच पतीला संसाराचा गाडा ओढायला मदत करत उदरनिर्वाहासाठी चहा-नाश्त्याचे हॉटेल तिने सुरु केले आहे. तर सोशल मीडियामधून मिळणाऱ्या पैशांसाठी सोशल मीडिया कंटेंट क्रिएशनकडे वळणाऱ्यांनाही यातून एक बोध घेण्याची गरज आहे. कंटेंट क्रिएशनच्या माध्यमातून प्रसिद्धी आणि पैसा कमावण्यासाठी वेळ खर्ची घालवण्या आधी सुरुवातीला आपला उत्पन्नाचा एक मुख्य स्त्रोत तयार करणेच उत्तम ठरते.





