शहरातील क्रांती चौकामध्ये आज स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केले. एमपीएससी परीक्षेबाबतच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी हे आंदोलन केले. एमपीएससीने पुढे ढकललेल्या परीक्षा या नोटिफिकेशन काढल्यापासून 45 दिवसानंतर घेण्यात याव्यात. तसेच PSI, STI सह विविध भरती प्रक्रियेमध्ये पदांच्या संख्येत वाढ करण्यात यावी अशी मागणी या आंदोलन विद्यार्थ्यांनी केली आहे.
advertisement
यावेळी राज्य सरकारच्या विरोधात विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. दोन तास आंदोलन केल्यानंतर विद्यार्थ्यांनी पोलिसांच्या सूचनेनुसार आंदोलन मागे घेतले. सरकारने आणि एमपीएससीने तात्काळ मागण्या मान्य कराव्या अन्यथा पुन्हा आंदोलन करू, असा इशारा आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी यावेळी दिला आहे.
आम्ही खूप मेहनतीने आणि कष्टाने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो पण सरकारमध्येच काहीतरी उलटे नियम काढतात आणि परीक्षा उशिरा होते किंवा लवकर परीक्षा झाली तर लवकर निकाल लावत नाहीत. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो. तसंच काही परीक्षांचे निकाल हे सरकार राखीव ठेवते किंवा कोर्टामध्ये त्या परीक्षा संदर्भातला निकाल जातो आणि यामुळे अनेक विद्यार्थ्यांचा वेळ, वय, मेहनत ही वाया जाते. तर सरकारने याकडे गांभीर्याने बघावे आणि आमचा लवकरात लवकर निकाल लावावा आणि लवकरात लवकर जागांची भरती करावी अशी आमची मागणी आहे, असं आंदोलन करणारे विद्यार्थी म्हणाले.





