छत्रपती संभाजीनगर: महाराष्ट्र पोलीस होणं हे अनेकांचं स्वप्न असतं. लवकरच राज्यात पोलीस भरती होत आहे. त्यासाठी लाखो तरुणांनी तयारी सुरू केलीय. पोलीस भरतीमध्ये मैदान चाचणीनंतर सगळ्यात महत्त्वाचा टप्पा लेखी परीक्षेचा असतो. अनेक वेळा विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेची तयारी करण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे लेखी परीक्षेचा अभ्यास नेमका कसा करावा? असा अनेकांना प्रश्न असतो. याबाबत सविस्तर माहिती छत्रपती संभाजीनगर येथील मार्गदर्शक प्रा. जायभाये यांनी सांगितली आहे.
advertisement
लेखी परीक्षेचं स्वरूप
पोलीस भरतीची लेखी परीक्षा 100 गुणांची असते आणि त्यासाठी दीड तासांचा कालावधी असतो. अंकगणित, बुद्धीमत्ता चाचणी, मराठी व्याकरण आणि समान्यज्ञान व चालू घडामोडी या विषयांचा या परीक्षेसाठी समावेश असतो. या प्रत्येक विषयाला 25 गुण असतात. त्यामुळे शारीरिक चाचणीचा सराव करत असतानाच अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण आणि सामान्यज्ञान व चालू घडामोडी या विषयांचा अभ्यास करावा.
पोलीस भरती: शारीरिक चाचणीला मिळतील पैकीच्या पैकी गुण, या टिप्सचा होईल फायदा, Video
घाई न करता सोडवावा पेपर
पोलीस भरतीचा लेखी पेपर हा ऑफलाईन असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अत्यंत शांततेने आणि कोणत्याही प्रकारची घाई न करतांना पेपर सोडवावा. पेपरमधील प्रश्न ज्या क्रमाने आले आहेत, त्याच क्रमाने सोडवावेत. अधून-मधून प्रश्न सोडवू नयेत. अगोदर झालेल्या पोलीस भरती परीक्षेच्या प्रश्नपत्रिका पाहून त्यांचा सराव करावा. हा सराव वेळ लावून करावा. त्यामुळे पेपर सोडवण्याचे वेळेचे गणित योग्य पद्धतीनं साधता येईल, असे प्रा. जायभाये सांगतात.
गणितावर द्या लक्ष
विशेष करून गणिताच्या पेपरवरती जास्त लक्ष द्यावं. जे प्रश्न अवघड जातात त्यांचा जास्तीत जास्त सराव करावा. गणिताचे बेसिक प्रश्न शाळेत असताना अभ्यासलेले असतात. त्यांचा पुन्हा सराव करून उजळणी करावी. चालू घडामोडींचा देखील चांगला अभ्यास करावा. यावरती देखील मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारण्यात येतात. तुम्ही ज्या जिल्ह्यातून फॉर्म भरलेला आहे तिथली सर्व राजकीय, भौगोलिक, सामाजिक आणि ऐतिहासिक गोष्टींची माहिती असावी.
सतत मोबाईल, लॅपटॉप पाहणं ठरू शकतं धोकादायक, चष्मा लागण्यापूर्वी अशी घ्या काळजी, Video
ही काळजी घ्याच
पोलीस भरतीचा पेपर ऑफलाईन असल्यामुळे तुम्हाला उत्तर पत्रिकेमध्ये प्रश्नांची उत्तरे गोल करायची आहेत. ती व्यवस्थित पेनाने संपूर्ण गोल करावित. ते गोल करताना कोणत्याही प्रकारची घाई करू नये. यामुळे देखील तुमचे मार्क कट होऊ शकतात. तसेच अत्यंत शांत मनाने आणि कोणत्याही प्रकारची घाई न करता पेपर सोडवावा. अशा पद्धतीने तुम्ही पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेची तयारी करावी, असे प्रा. जायभाये सांगतात.





