परभणी जिल्ह्यातील चारठाणा या छोट्याशा गावामध्ये राहत असलेल्या देशपांडे कुटुंब यांना संग्राम हा एकमेव एकुलता एक मुलगा. मुलाच्या शिक्षणासाठी सर्व अर्पण करण्याचं कुटुंबाने आधीच ठरवलं होतं. त्यामुळे संग्राम पाच वर्षांचा असतानाच त्यांनी गावात असलेलं वडिलोपार्जित घर विकलं आणि छत्रपती संभाजीनगर गाठलं.
advertisement
संभाजीनगर इथे संग्राम याचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण झालं. यानंतर कोल्हापूर इथे त्याने इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. इथे देखील त्याचे आई-वडील त्याच्या सोबत होते आणि आई आणि वडील दोघांनीही काम करून त्याला शिकवलं. वडिलांनी सिक्युरिटी गार्डची नोकरी केली तर आईने एमआयडीसीमध्ये काम केलं.
यानंतर संग्राम याने तीन वर्षे हैदराबाद येथे नोकरी केली. परंतु संशोधनातच आवड असल्याने त्याने त्यासाठी प्रयत्न करणे सुरू केलं. अमेरिकन सरकारच्या शिष्यवृत्तीच्या बळावर त्याला संशोधनासाठी अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना स्टेट युनिव्हर्सिटी इथे जाण्याची संधी मिळाली. सध्या त्याने प्रथम वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला असून कुटुंबीयांना भेटण्यासाठी जालना इथे आला आहे. आई-वडिलांचा त्याग आणि समर्पण असेल आणि त्याला मुलाची जिद्द, कष्ट आणि प्रामाणिकपणाची साथ असेल तर कोणतीही गोष्ट आपण शक्य करून दाखवू शकतो हे सिद्ध करणारी संग्राम आणि त्याच्या कुटुंबीयांची ही गोष्ट सगळ्यांनाच प्रेरणादायी आहे.