या प्रकरणी पोलिसांनी अधिक तपास केला असता, दोघांची फेसबुकवरून ओळख झाली होती. या ओळखीनंतर नाशिकमधील युवकाने धर्मांतर करत मुस्लीम रितीरिवाजाप्रमाणे बांगलादेशी युवतीसोबत लग्न केलं. नाशिकच्या तरुणाला भेटण्यासाठी संबंधित युवती बांगलादेशहून अनेकदा लपून-छपून भारतात यायची. ती नाशिकच्या युवकासोबत मुंबईत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. दोघांनी लग्न केल्यानंतर ते मागील तीन वर्षांपासून नाशिकमध्ये राहत आहेत. पोलिसांनी तिला सापळा रचून अटक केली.
advertisement
विधानसभा निवडणुकीत मतदान केलं
धक्कादायक बाब म्हणजे, तिने नाशिकमध्ये विधानसभा निवडणुकीत मतदान केल्याची माहिती उघडकीस आली आहे. नाशिकच्या युवकासोबत लिव्ह इन मध्ये राहिल्यानंतर युवती बेकायदेशीररित्या कोलकत्त्यामार्गे बांगलादेशात गेली. त्यानंतर ती गर्भवती असल्याचे तिला समजले. तिने मुलीला जन्म दिला. ही बाब युवकाला समजली. तिला भेटण्यासाठी तो बांगलादेशात विमानाने १० वेळा गेल्याचं समोर आलं.
तिच्यासाठी त्याने धर्मांतर करत मुस्लीम रितीरिवाजाप्रमाणे लग्नही केले. त्यावेळी त्यांची मुलगी चार वर्षांची होती. गेल्या तीन वर्षांपासून ती नाशिक शहरातील मुंबई नाका परिसरात युवकासोबत राहत होती. तिची मुलगी नाशिकमधील एका शाळेत शिक्षण घेत असल्याची माहिती आहे. नाशिकमधील युवकासोबत लग्न केल्यानंतर संबंधित तरुणीने बांगलादेशी पासपोर्ट काढून तीन महिन्यांच्या व्हिसावर २०२१ मध्ये भारतात आली. व्हिसा संपल्यानंतरही ती बांगलादेशात परत गेली नाही. तिने पासपोर्ट फाडून भारतात वास्तव्य केलं.
गोवा, शिमला लोणावळ्याला पर्यटन
प्रियकरासोबत ती देहरादून, शिमला, गोवा, लोणावळा आणि मुंबईला देखील पर्यटन केल्याचं समोर आलं आहे. याबाबतचे फोटोही पोलिसांच्या हाती लागले आहेत. पोलिसांनी तिला फसवणूक केल्याप्रकरणी, बनावट कागदपत्रे तयार केल्याने व परकीय नागरिक असल्याने अटक केली आहे. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल केला.
