बीड जिल्ह्याच्या धारूरमध्ये एक अपहरण कांड उघडकीस आलं आहे. हात उसणे घेतलेल्या पैशांसाठी चार जणांनी एका तरुणाचं अपहरण केलं होतं. मुलगा जिवंत हवा असेल तर आताच्या आता अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये टाका, अशी धमकी अपहरणकर्त्यांनी दिली होती. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे तरुणाची सुटका करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. इतर दोन आरोपी फरार आहेत.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहा हजार रुपयांचे व्याजासह 80 हजार रुपये झाल्याने ते वसूल करण्यासाठी चौघांनी एका तरुणाचं अपहरण केलं होतं. तसेच आरोपी अपहरण झालेल्या मुलाच्या घरी फोन करून मुलगा जिवंत पाहिजे असेल तर आताचे आता पन्नास हजार रुपये टाका, नाहीतर तो तुम्हाला दिसणार नाही, अशी धमकी दिली. या प्रकरणात धारूर पोलिसांनी तातडीने तपास करत अंबाजोगाई जवळील साकुर येथून दोघांना अटक केली. तर दोघेजण फरार आहेत.
कृष्णा मैंद असे अपहरण झालेल्या युवकाचे नाव असून त्याच्यावर सध्या अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कृष्णा याने आरोपी धनराज चाटे पृथ्वीराज राग आणि परमेश्वर आगाव यांच्याकडून दहा हजार रुपये पैसे उसने घेतले होते. याचं व्याज न दिल्याचे कारण सांगत या तीन आरोपींसह अन्य एकाने कृष्णाचं अपहरण केले होते.
दहा हजार रुपयाला दररोज एक हजार रुपये व्याज, अशा पद्धतीने आरोपींनी कृष्णाला जे दहा हजार रुपये दिले होते. दिवसाला एक हजार रुपये व्याज असल्याने अवघ्या काही दिवसांत ही रक्कम 80 हजार रुपये इतकी झाली. हीच रक्कम उकळण्यासाठी आरोपींनी हे अपहरण केलं. पण पोलिसांनी आरोपींचा मनसुबा हाणून पाडला आहे. दोघांना अटक केली आहे. संबंधित आरोपींनी अशा पद्धतीने यापूर्वी इतर काही गुन्हे केले आहेत का ? याचा शोध पोलीस घेत आहेत.
