मृत महिलेचे नाव भाग्यश्री असे असून तिचे लग्न सुमारे पाच वर्षांपूर्वी चनई येथील अजय चौरे याच्याशी झाले होते. सुरुवातीला संसार सुरळीत सुरू असला तरी काही काळानंतर कौटुंबिक वाद वाढल्याचे माहेरच्यांचे म्हणणे आहे. पतीला दारूचे व्यसन लागल्यानंतर त्याच्याकडून वारंवार मारहाण होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच सासू-सासऱ्यांकडून घरकामावरून टोमणे मारले जात होते, असा दावा तक्रारीत नमूद आहे.
advertisement
दरवाजा उघडेना, दुर्गंधी यायला लागली, पोलिसांनी दार तोडलं, बीडच्या लॉजमध्ये तरुणाचा संशयास्पद अंत
दरम्यान, मुलगी आम्रपाली आजारी पडल्यावर उपचारासाठी पाच हजार रुपयांची मागणी केल्याचेही समोर आले आहे. आर्थिक अडचणीमुळे वडिलांनी काही रक्कम पाठवली; मात्र उर्वरित पैसे न दिल्याने पतीकडून गंभीर परिणामांची धमकी दिली गेल्याचा आरोप आहे. या सर्व प्रकारामुळे भाग्यश्री मानसिक तणावाखाली असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.
19 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळच्या सुमारास भाग्यश्रीने राहत्या घरासमोर असलेल्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच माहेरचे नातेवाईक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. मृत्यूला पती, सासू आणि सासरे जबाबदार असल्याचा ठपका ठेवत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
पोलीस उपनिरीक्षक या प्रकरणाचा पुढील तपास करत असून संबंधितांकडून चौकशी केली जात आहे. या घटनेने पुन्हा एकदा कौटुंबिक छळाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे.






