मिळालेल्या माहितीनुसार, १९ वर्षीय पीडित तरुणी कोनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सरवली गावात राहते. ११ फेब्रुवारीला ती घरातून अचानक बेपत्ता झाली होती. पीडितेच्या घरच्यांनी तिचा सर्वत्र शोध घेतला पण तिचा काहीच थांगपत्ता लागला नाही. अखेर पीडितेच्या वडिलांनी कोनगाव पोलीस ठाणं गाठत मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.
पण तक्रार दाखल झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच मुलीच्या वडिलांना एक फोन आला आणि तुमची मुलगी रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडल्याची माहिती देण्यात आली. शिवाय एका रिक्षाचालकाने मुलीला रुग्णालयात दाखल केल्याची माहिती देखील फोनवरून देण्यात आली. फोनवरून माहिती मिळताच मुलीचे वडील कुटुंबीयांतील इतर सदस्यांसोबत रुग्णालयात दाखल झाले. पण ज्यावेळी त्यांनी मुलीकडे विचारणा केली. यावेळी मुलीनं जे सांगितलं, ते ऐकून वडिलांसह पोलीसही हादरले.
advertisement
पीडितेनं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला तिचा प्रियकर कुणाल पासवानने केला आहे. मागील काही महिन्यांपासून पीडितेचं आरोपीसोबत प्रेमसंबंध निर्माण झाले होते. आरोपीनं लग्नाचं आमिष दाखवत पीडितेवर लैंगिक अत्याचार केला. पीडितेला टेमघर परिसरात घेऊन जात तिच्या इच्छेविरोधात अत्याचार केला. यानंतर पीडितेनं आरोपीकडे लग्नाची विचारणा केली, यावेळी आरोपीनं घरी घेऊन जातो, असं म्हणत पीडितेला शेलार गावच्या पुढे असलेल्या अंबिका सिटीकडे जाणाऱ्या रस्त्यावर घेऊन आला. याठिकाणी गेल्यानंतर आरोपीनं अचानक पीडितेच्या मानेवर आणि हातावर वार केले. यानंतर पीडितेला जखमी अवस्थेत घटनास्थळी टाकून पळ काढला.
याप्रकरणी पोलिसांनी अपहरण, बलात्कार आणि जीवे मारण्याचा प्रयत्न अशा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हल्ल्यानंतर पोलिसांनी फरार झालेल्या आरोपी कुणाल पासवानला अटकही केली आहे. पीडितेवर मुंबईच्या जेजे रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
