अंबाजोगाई येथील गुरुवार पेठ परिसरात राहणारे सुयश प्रेमचंद मुथा हे अनेक वर्षांपासून बियाणे विक्रीचा व्यवसाय करतात. जुलै 2025 मध्ये सातारा जिल्ह्यातील येस फ्रेश फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संचालक संजय बाबासाहेब भगत आणि ओंकार संजय भगत यांनी मुथा यांची भेट घेतली. त्यांनी उच्च प्रतीच्या राजमा बियाण्याचे नमुने दाखवून मोठ्या प्रमाणात माल पुरवण्याचे आमिष दाखवले. विश्वास ठेवून मुथा यांनी 21 जुलै रोजी 85 टन राजमा बियाणे खरेदीचा करार केला आणि आरटीजीएसद्वारे टप्प्याटप्प्याने रक्कम अदा केली.
advertisement
करारानुसार मालाची पाहणी करण्यासाठी मुथा साताऱ्याला गेले असता, प्रत्यक्षात दाखवलेल्या नमुन्यांप्रमाणे दर्जेदार बियाणे उपलब्ध नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर तडजोडीअंती 25 टन राजमा बियाण्याची नवीन ऑर्डर देण्यात आली. यासाठी एकूण 26 लाख 31 हजार रुपये संबंधित कंपनीकडे जमा करण्यात आले. मात्र, 30 ऑगस्ट 2025 रोजी केवळ 12 टन बियाणे पाठवण्यात आले.
पाठवलेला माल तपासल्यानंतर तो अत्यंत निकृष्ट दर्जाचा असल्याचे स्पष्ट झाले. बियाण्यात मोठ्या प्रमाणावर भेसळ, माती तसेच पेरणीस अयोग्य घटक आढळून आले. उर्वरित माल किंवा भरलेली रक्कम परत मिळावी यासाठी मुथा यांनी आरोपींशी वारंवार संपर्क साधला. मात्र, त्यांनी पैसे परत देण्यास स्पष्ट नकार दिला तसेच अपमानास्पद भाषेत उत्तरे दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर सुयश मुथा यांनी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार संजय बाबासाहेब भगत, ओंकार संजय भगत, अरविंद सोपान विधाते, सारिका सोमनाथ शिंदे, बालुताई सोमनाथ जगताप आणि बालकृष्ण पंढरीनाथ चव्हाण या सहा संचालकांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.






