रांजणगाव शेनपुंजी येथील नर्सरी कॉलनीतील एका खाजगी शिकवणी वर्गातील शिक्षकाने चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. 15 जून रोजी सकाळी ही घटना समोर आली असून, याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात आरोपी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रांजणगाव शेनपुंजी येथील 'टॉपर क्लासेस' या खाजगी शिकवणीमध्ये शिकवणाऱ्या सुभाष जाधव (वय 45) याने विद्यार्थिनीला अश्लील व्हिडिओ दाखवत लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप आहेत. पीडित विद्यार्थिनी ही चौथीत शिकत असून, गेल्या दीड वर्षांपासून ती या क्लासला जात होती.
advertisement
नराधम शिक्षकाने विद्यार्थिनीवर अत्याचार केल्यानंतर हा प्रकार घरी सांगितला तर आई-वडिलांचे तुकडे करेल अशी धमकीही दिली होती. त्यामुळे घाबरलेल्या या मुलीने क्लासला जाणेच बंद केले होते. त्यानंतर काही दिवसांपासून ती वर्गात येणं बंद झाल्याने पालकांनी विचारणा केली. त्यावेळी मुलीने घडलेला प्रकार सांगितल्याचे समजते. मुलीच्या जबाबानंतर पालकांनी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
