जामडी येथील माजी सरपंच रामचंद्र पवार यांचा मुलगा राजू पवार शेती व्यवसाय करत होते. मंगळवारी सकाळी सुमारे 8 वाजताच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे शेतात फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडले. मात्र, बराच वेळ झाला तरी ते घरी परतले नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. फोनला रिंग जात होती, मात्र कॉल उचलला जात नव्हता. यामुळे चिंतेत पडलेल्या कुटुंबीयांनी ग्रामस्थांच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली.
advertisement
“बाबा, मी आहे ना...,” डोळ्यासमोर आई गेली, लेकीनं वडिलांना सावरलं, छ. संभाजीनगर हळहळलं!
दरम्यान, साडेबारा वाजताच्या सुमारास राजू पवार यांच्या शेतालगत असलेल्या वन विभागाच्या गट क्रमांक 95 मधील जमिनीत त्यांचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला. अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने त्यांच्या डोक्यावर तसेच कमरेखाली गुप्तांगावर वार केल्याचे स्पष्ट झाले. मृतदेह दिसताच कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.
या घटनेची माहिती पोलिस पाटील निर्मला पवार यांनी तात्काळ कन्नड ग्रामीण पोलिसांना दिली. त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी अपराजिता अग्निहोत्री, सहायक पोलिस निरीक्षक डॉ. रामचंद्र पवार, बीट जमादार धीरज चव्हाण यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तपासासाठी छत्रपती संभाजीनगर येथून श्वानपथक, ठसेतज्ज्ञ, मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही पाचारण करण्यात आले. मात्र, रात्री उशिरापर्यंत आरोपीचा ठोस माग काढण्यात पोलिसांना यश आले नव्हते.
दरम्यान, कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करण्यात आली असून, उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. राजू पवार यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी तसेच आई-वडील असा परिवार आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कन्नड ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला असून, बुधवारी शवविच्छेदन करण्यात येणार आहे. संभाव्य तणाव लक्षात घेता गावात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
राजकीय वैमनस्य की अन्य कारण?
राजू पवार यांचे कुटुंब स्थानिक राजकारणात सक्रिय आहे. पाच वर्षांपूर्वी त्यांचे वडील रामचंद्र पवार सरपंच होते, तर सध्या त्यांच्या काकू रेणुका पवार या सरपंचपदावर आहेत. वडिलांनंतर राजू पवार हे विद्यमान सरपंच असलेल्या काकूंच्या बहुतांश शासकीय कामकाजाची जबाबदारी सांभाळत होते. त्यामुळे ही हत्या राजकीय वैमनस्यातून झाली की अन्य कोणत्या कारणामुळे, याचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू आहे.






