मोबाईल दिला नाही, या कारणावरून 16 वर्षीय मुलाने थेट खवडा डोंगरावरून उडी मारून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत तरुणाचे नाव अथर्व गोपाल तायडे आहे. तो मूळचा बुलढाण्यातील जळगाव जामोद येथील रहिवासी आहे. सध्या तो स्वातिक सिटी, साजापूर शिवार, वाळूज येथे राहत होता. तो पोलीस भरतीचे प्रशिक्षण घेत होता.
advertisement
अथर्वने आईकडे मोबाईल फोन मागितला होता. पण तिने तो देण्यास नकार दिला. रागाच्या भरात अथर्वने तिसगाव येथील खावडा डोंगरावरून उडी मारली. ही घटना पाहून परिसरात एकच खळबळ उडाली. जखमी अवस्थेत असलेल्या अथर्वला अतुल आडे आणि स्वप्नील पवार यांनी तातडीने दवाखान्यात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
घटनेनंतर आईने फोडलेला हंबरडा हृदयद्रावक होता. वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून पुढील तपास सुरू केला आहे.
मोबाईल फोनमुळे अशा धक्कादायक घटना घडत असल्याने मोबाईलचे व्यसन, मानवी आयुष्यावर होणारे विपरीत परिणाम याची चर्चा सुरू झाली आहे. 16 वर्षांचा अथर्व हा पोलीस भरतीचे प्रशिक्षण घेत होता. पोलीस दलात भरती झाला असता तर कदाचित त्याने घरातील आर्थिक भार खांद्यावर घेतला असता. मात्र, अथर्वने उचललेल्या टोकाच्या पावलामुळे मोबाईलच्या दुष्परिणामावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
