या प्रकरणात मृताचा भाऊ अमोल रामकृष्ण बर्डे (रा. हरीओमनगर, जटवाडा रोड, हर्सूल) यांनी बेगमपुरा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रविनाथ बर्डे यांनी 9 फेब्रुवारी रोजी पहाटे पावणे दोन वाजण्याच्या सुमारास गुरुगणेशनगर येथील श्री साई लॉजमधील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. पत्नी शिवानी हिचा रविनाथवर सतत संशय होता. “तू कोणत्या मुलीशी बोलतोस?” असा आरोप करत ती नेहमी भांडण करत असे. यासोबतच तिने त्याला आपल्या मुलाशीही नीट बोलू दिले नाही, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
advertisement
पत्नीच्या या सततच्या संशय, भांडण आणि मानसिक त्रासामुळे रविनाथ प्रचंड तणावाखाली होता. अखेर या त्रासाला कंटाळून त्याने श्री साई लॉज, गुरुगणेशनगर येथे गळफास घेत आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, पतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी विवाहित पत्नीविरोधात बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.






