नेमकं घडलं काय?
दामिनी पथकाच्या अंमलदार कल्पना खरात, सुनीता नागलोद, अंबिका दारुंटे, सरिता कुंडारे, कविता गवळी या 5 सप्टेंबर रोजी एमजीएम महाविद्यालयात गस्त घालत होत्या. यावेळी काही विद्यार्थिनींनी त्यांची भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून 2 मुले विविध कंपनीच्या स्पोर्ट्स बाइकवर येऊन फटाक्यांसारखा कर्णकर्कश आवाज करीत जातात. इतरांच्या मागे सुसाट हॉर्न वाजवत अचानक ब्रेक दाबून दचकवतात. वेडीवाकडी बाइक चालवत विद्यार्थिनींचा पाठलाग करीत कट मारून निघून जातात, अशी तक्रार केली.
advertisement
पथकामार्फत ही बाब थेट पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्यापर्यंत पोहोचली. पवार यांनी दोघांची माहिती काढण्याचे आदेश दिले. त्यात महाविद्यालयातूनच समीरच्या इंस्टाआयडीविषयी माहिती प्राप्त झाली. त्यानंतर पवार यांच्या आदेशावरून छावणीचे सहायक पोलिस निरीक्षक विवेक जाधव यांनी दोघांचा शोध घेत जिन्सी परिसरातून अटक करून सिडको पोलिसांच्या ताब्यात दिले.
याप्रकरणी महाविद्यालयातील विद्याथिनींनी तक्रार देण्यास नकार दिला. मात्र, सुजाण नागरिक म्हणून पोलिसांपर्यंत टवाळखोरांची माहिती पोहोचवली. त्याची दखल घेत पोलिसांच्या वतीने अंमलदार कल्पना खरात यांनी फिर्यादी होत गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे, एक दोन नाही तर तब्बल बीएनएसच्या विनयभंग, आयटी अॅक्टसह इतर 14 गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल केला.
वडिलांचे भंगारचे दुकान
मुख्य आरोपी समीरचे सोशल मीडियावर 1 लाख 40 हजार फॉलोअर्स आहेत. वडिलांचे नारेगावमध्ये भंगारचे गोडाऊन असून दहावी नापास समीर तेच काम करतो. मात्र, उच्चभ्रू राहणीमान असल्याचे दाखवत सेकंड हँड गाड्या विकणाऱ्या मित्राकडून गाड्या घेऊन टवाळखोरी करत रीलस्टार होण्याचे स्वप्न पाहतो.
लोक घाबरल्याचे रिल्स
दोघे टवाळखोर एवढेच करून थांबत नव्हते, तर नागरिक, मुलींना कट मारताना, बाइकच्या आवाजानंतर कसे घाबरतात, त्याचे चित्रीकरण करून सोशल मीडियावर रील पोस्ट करत होते. त्याचे असे व्हिडीओ रेकॉर्ड करणारा त्याचा मित्र इजाजच्या हातात हातकड्या पडून पोलिस कोठडीत जाण्याची वेळ आली. दोघांनी पोलिस कोठडीत हात जोडून या प्रकाराविषयी माफी मागितली.