नेमकं घडलं काय?
नक्षत्रवाडी परिसरात सुरू असलेल्या मातोश्री मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाचे डॉ. जाधव हे संचालक आहेत. रुग्णालयात एकूण 22 कर्मचारी कार्यरत असून त्यामध्ये रिसेप्शनवर काम करणारी शर्ली भालेराव नावाची तरुणी होती. काही काळापासून तिच्या कामकाजात हलगर्जीपणा दिसून येत होता. रुग्णालयाचा गणवेश घालण्यास तिने नकार दिला होता. व्यवस्थापनाकडून वारंवार सूचना देऊनही वागण्यात सुधारणा न झाल्याने कामावरून काढण्याची सूचना देण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर 16 जानेवारीच्या रात्री शर्लीचा मित्र प्रवीण बिश्वाकर्मा याने डॉ. जाधव यांना फोन करून धमकी दिली. या घटनेनंतर संबंधित कर्मचाऱ्याला रुग्णालयाच्या अधिकृत व्हॉट्सअॅप ग्रुपमधून वगळण्यात आले.
advertisement
डॉक्टरांवर 15 ते 20 जणांचा हल्ला
17 जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास शर्ली, प्रवीण, एक महिला आणि 15 ते 20 जणांचा जमाव रुग्णालयात दाखल झाला. त्यांनी अचानक डॉ. जाधव यांच्यावर हल्ला चढवला. लाठ्या-काठ्या व धारदार वस्तूंचा वापर करत रुग्णालयातील साहित्याची नासधूस करण्यात आली. प्रवीण बिश्वाकर्मा याने डॉ. जाधव यांच्या कानावर जोरदार वार केल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना बाहेर ओढत बेदम मारहाण करण्यात आली. ते रक्तस्राव होऊन खाली कोसळल्यानंतरही हल्ला थांबला नाही. सोबत असलेल्या एका महिलेने त्यांच्या मानेवर कुंडी टाकून मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद असून घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत सर्व हल्लेखोर फरार झाले होते.
डॉक्टर गंभीर जखमी
हल्ल्यानंतर डॉ. जाधव यांच्या डाव्या कानाने ऐकू येणे पूर्णपणे बंद झाले आहे. तसेच शरीरावरही अनेक गंभीर जखमा झाल्या आहेत. प्रकृती स्थिर झाल्यानंतर 20 जानेवारी रोजी डॉ. जाधव यांनी दिलेल्या जबाबावरून शर्ली भालेराव, प्रवीण बिश्वाकर्मा आणि त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेनंतर सर्व आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. लवकरच सर्वांना अटक करण्यात येईल, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक शैलेश देशमुख यांनी दिली.






