मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना डोंबिवली पूर्व परिसरात घडली आहे. मयत तरुणी एका महाविद्यालयीन शिक्षण घेत होती. ती काटई बदलापूर रस्त्यावरील खोणी भागातील फिफ्टी फिफ्टी ढाबा भागात आपल्या मामाच्या घरी राहत होती. घटनेच्या दिवशी रात्री उशिरा मयत तरुणी मोबाईलवर बोलत बसली होती. ही बाब मामाच्या लक्षात आल्यानंतर मामाने तिचा मोबाईल काढून घेतला.
advertisement
मामाचं हे कृत्य जिव्हारी लागल्याने, मंगळवारी तरुणीने रागाच्या भरात इमारतीच्या अकराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली. या आत्महत्येप्रकरणी मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, घटनास्थळाचा पंचनामा केला. तसेच त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवत अपघाती मृत्यूची नोंद केली.
एका महाविद्यालयीन तरुणीने अशाप्रकारे इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मामाने मोबाईल काढून घेतला म्हणूनच मुलीने आत्महत्या केली, की यामागे आणखी काही कारण आहे, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
