Cyber Crime : ऑनलाईन गॅस बिल भरणं पुण्यातील ज्येष्ठाला भोवलं; एक क्लिक अन् खात्यातून 23 लाख गायब
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
एका ८३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला गॅस देयक न भरल्यामुळे पुरवठा खंडित करण्याची भीती दाखवण्यात आली. सायबर भामट्यांनी त्यांच्या मोबाईलवर एक संशयास्पद लिंक पाठवून त्यावर माहिती भरण्यास सांगितले.
पुणे : पुणे शहरात सायबर चोरट्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. वेगवेगळ्या तीन घटनांमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना सुमारे ५७ लाख रुपयांचा गंडा घातला आहे. यातील पहिली धक्कादायक घटना औंध भागात घडली. यात एका ८३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला गॅस देयक न भरल्यामुळे पुरवठा खंडित करण्याची भीती दाखवण्यात आली. सायबर भामट्यांनी त्यांच्या मोबाईलवर एक संशयास्पद लिंक पाठवून त्यावर माहिती भरण्यास सांगितले. जशी फिर्यादीने ती लिंक उघडली, तसे त्यांच्या बँक खात्यातून २२ लाख ९४ हजार रुपये परस्पर लंपास करण्यात आले. या प्रकरणी चतुःशृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक अश्विनी ननावरे या गुन्ह्याचा तपास करत आहेत.
दुसरी घटना मुंढवा परिसरात घडली असून, एका ४७ वर्षीय व्यक्तीला ऑनलाइन टास्क आणि आभासी चलनात गुंतवणुकीच्या नावाखाली तब्बल २६ लाख रुपयांना लुबाडण्यात आले आहे. सुरुवातीला काही रक्कम गुंतवल्यानंतर त्यांना चांगला परतावा मिळत असल्याचे आभासी चित्र निर्माण करून चोरट्यांनी त्यांना जाळ्यात ओढले. मात्र, मोठी रक्कम गुंतवल्यानंतर कोणताही परतावा न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
advertisement
फसवणुकीची तिसरी घटना सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका महिलेची ८ लाख १५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. अशा प्रकारे पुण्याच्या विविध भागांत सायबर गुन्हेगार सक्रिय आहेत. कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करू नका किंवा गुंतवणुकीच्या खोट्या आमिषांना बळी पडू नका, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 19, 2025 10:45 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Cyber Crime : ऑनलाईन गॅस बिल भरणं पुण्यातील ज्येष्ठाला भोवलं; एक क्लिक अन् खात्यातून 23 लाख गायब










